अखेर ठरलं ; विशेष आधिवेशनात फ्लोअर टेस्ट आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम
X
राज्यातील अविश्वसनीय सत्तानाट्याच्या परीवर्तनानंतर आता नव्या एकनाथ शिंदे सरकारचा विश्वासमत ठराव आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (ता.३) विधिमंडळाच्या विशेष आधिवेशन पार पडणार आहे.
काल विस्मयकारक पध्दतीनं राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं. शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने कांजूरमार्गमधील मेट्रो स्टेशन पुन्हा आरेमध्ये आणण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का दिलेला असतानाच दुसरीकडे नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे.
बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनातच ही निवडणूक पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून पत्रकच जारी करण्यात आलं आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त झालं होतं. तेव्हापासून उपाध्यक्ष नरहरी झिरवळच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय अडथळे येत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. उद्धव ठाकरे सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परवानगी देण्यासाठी राज्यपालांना विनंती करून देखील ही परवानगी देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सूत्र वेगाने हलू लागली असून तातडीने बोलावण्यात आलेल्या अधिवेशनातच ही निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विधिमंडळ सचिवालयाने पत्रक जारी केलं असून त्यानुसार ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी ही निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
So already announced Maharashtra Assembly session which was to be held on 2nd & 3rd July has been postponed just because it coincides with BJP national executive meeting in Hyderabad.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 1, 2022
It's a sign that BJP has started considering itself omnipotent - more powerful than constitution
कॉंग्रेसनं मात्र या विशेष आधिवेशनावर टीका केली आहे. विशेष आधिवेशन यापूर्वी २ आणि ३ जुलै रोजी जाहीर करण्यात आलं होतं. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक हैदराबाद इथे असल्यामुळचं आधिवेशन पुढे ढकलून ३ आणि ४ जुलै तारीख करण्यात आली. संविधानिक संस्था आणि आदेशापेक्षा भाजप मोठी असल्याचं भाजपची कृती गैरसंविधानिक असल्याची टिका कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.