देवेंद्र फडणवीस एकटे पडलेयत का?
X
भारतीय जनता पक्षातील राज्यातले सर्वांत शक्तिमान नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र सध्या देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन काहीसं कमी झाल्यासारखं दिसते आहे. विनोद तावडे यांची राष्ट्रीय महासचिव म्हणून झालेली बढती असो किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेलं तिकीट असो, किंवा पंकजा मुंडे यांची वक्तव्ये असोत भाजपमधलं वारं बदलल्याचीच ही लक्षणे आहेत.
चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेतलं असलं तरी ते गडकरी कँपमधले नेते आहेत. फडणवीस कँप मधल्या चित्रा वाघसारख्या नेत्यांना डावलून त्यांना तिकीट देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवतीही मूळ भाजपमधले कोणीच नसते. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ यांच्या गराड्यात देवेंद्र फडणवीस असतात. तसेच अडीअडचणीला हेच नेते फडणवीसांच्या वतीने बोलायला धावतात. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नावालाच असून त्यांची स्वतःची वेगळीच चूल त्यांनी मांडलेली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील राजकारणात वजनदार असले तरीही देवेंद्र फडणवीस एकटे पडलेले दिसतात.
विनोद तावडे यांना विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते, त्यानंतर दोन वर्ष विनोद तावडे कुठेही सक्रीय नव्हते. विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना फडणवीस यांनी अडगळीत टाकले अशी चर्चा होत असते. पण आता विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. तर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी चित्रा वाघ यांचे नाव चर्चेत होते, पण त्यांच्याऐवजी बावनकुळे यांनी आपला अर्ज भरला. यावेळी नितीन गडकरी स्वत: उपस्थित होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला केलेल्या नेत्यांना आता पक्षात अच्छे दिन येत असल्याचे चित्र आहे.