भाजप नेत्याने उडवली आंबेडकरांच्या संविधानाची खिल्ली, म्हणाले भारत हिंदू राष्ट्र आहे, होता आणि असेल...
X
भाजप नेत्यांची वादग्रस्त विधान सातत्याने देशाच्या संविधानाचा अपमान करणारी असल्याचं दिसून येतं. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनीही असंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. सीटी रवी यांनी भारत एक हिंदु राष्ट्र आहे, होता आणि राहील. असं म्हणत भारताच्या संविधानाचा अपमान केलं आहे.
काँग्रेसवर टीका करताना रवी यांनी हे विधान केलं आहे, ते म्हणाले "कॉंग्रेसने सुरुवातीला तुष्टीकरणाचं राजकारण केलं पण आता त्यांनी (काँग्रेस) हिंदूंना भुरळ घालण्यासाठी पूजा करणं आणि मंदिरांमध्ये जाणं सुरू केलं आहे. त्यांच्या नेत्यांनी केवळ निवडणुकीच्या वेळीच मंदिरात जाता कामा नये."
दरम्यान, नुकतंच काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंदिरात जाऊन पुजा अर्चना केली होती. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना, रवी यांनी "भारत एक हिंदू राष्ट्र आहे, होता आणि असेल. आधी काँग्रेसने अल्पसंख्यांकांना खुश केले पण आता त्यांना माहित झाले आहे की हिंदू एकत्र आहेत. आता ते दुर्गा पूजा करत आहेत आणि मंदिरांमध्ये जात आहेत. जर तुम्ही हिंदू असाल तर हे फक्त निवडणुकीसाठी करू नका, तर नियमितपणे करा." सीटी रवी हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी AIMIM ची तुलना तालिबानशी देखील केली होती.
दरम्यान, सीटी रवी यांचं हे वक्तव्य आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या टीकेनंतर आलं आहे. ज्यात त्यांनी हिंदू मुला -मुलींना त्यांच्या धर्माचा आणि परंपरांचा अभिमान असला पाहिजे. असं म्हटलं होतं.
पुढे भागवत म्हणतात - "धर्मांतरण कसे केले जाते? हिंदू मुले आणि मुली शुल्लक स्वार्थासाठी, लग्नासाठी इतर धर्म कसे स्वीकारतात? जे हे करत आहेत ते चुकीचे आहेत, पण ती वेगळी बाब आहे. आपण आपल्या मुलांची काळजी घेत नाही का? आपण त्यांच्यावर घरीच संस्कार करायला हवेत. आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमानाने सांगितले पाहिजे."
दरम्यान, सीटी रवी यांच्या विधानावरून हे स्पष्ट होतं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची त्यांना आणि त्यांच्या पक्षाला काही किंमत नाही. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान भाजपने स्वीकारले असते तर अशी विधानं समोर आली नसती.
यापूर्वीही सीटी रवी यांनी अनेक वादग्रस्त विधान केलेली आहेत. दिवाळीला फटाके फोडण्याबाबतही त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. "हिंदूंनी त्यांचे सण कसे साजरे करावेत याबद्दल कोणी सल्ला का द्यावा? आम्ही दिवे पेटवू, मिठाई वाटू आणि हिरवे फटाकेही फोडू."
सीटी रवी यांनी आजही एक ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणतात - "तुम्ही धर्मांतर करा आणि आम्ही तुमची घरवापसी."
You Convert, we will do Ghar Wapsi ! ! !
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) October 11, 2021
एकंदरीत रवी यांची वादग्रस्त विधानांची मालिका सुरुच असल्याचं त्यांच्या ट्वीटर वरून दिसून येतं.