Home > Politics > राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदार शिवसेनेवर नाराज?

राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदार शिवसेनेवर नाराज?

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी अर्जावर सही करणाऱ्या १० अपक्ष आमदारांनी आता शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने नेमकं काय राजकारण सुरू आहे ते पाहा....

राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदार शिवसेनेवर नाराज?
X

राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरवत भाजपने महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माघार घेण्याचे आवाहन केले, पण फडणवीसांनी हे आवाहन फेटाळत निव़डणूक रिंगणातून माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर आता अपक्षांच्या मतांवर अवलंबून असलेली ही निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित झाले आहे. पण भाजप अपक्षांवर दबाव आणून मतं वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. घोडेबाजार होणार आहे अशी भीती तुम्हाला होती तर मग उमेदवार मागे का घेतला नाही, असा सवाल विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला केला आहे. तसेच भाजपकडे पुरेशी मतं असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

एकीकडे घोडेबाजाराचे आरोप होत असताना अपक्ष आमदारांनी मात्र घोडेबाजार शब्दालाच आक्षेप घेतला आहे. "घोडेबाजार" या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हा शब्द शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार वापरल्या गेल्यास अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. "अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणं चूक असून वारंवार घोडेबाजार-घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याची देखील जोरगेवार यांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोरगेवार यांनी शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.

त्यामुळे कोणत्याही अपक्षांची नाराजी ओढवून घ्यायची नाही, याचे भान सर्वच पक्षांना राखावे लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या संघर्षात राज्यसभेत कुणाचा खासदार पोहोचणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार नाराज नाहीत, सरकार मजबूत आहे हे सिद्ध करण्याची संधीदेखील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला यानिमित्ताने मिळाली आहे.

Updated : 4 Jun 2022 6:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top