अजित पवार यांना धक्का, आयकर विभागाकडून १ हजार कोटींची मालमत्ता जप्त?
X
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाकडून मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित १ हजार कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनेही दिले आहे. सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या या वृत्तामध्ये अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ५ मालमत्तांचा समावेश असून त्यापैकी नरीमन पॉईंट येथील निर्मल टॉवर या इमारतीचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची आयकर विभागाकडून चौकशी सुरू होती. त्या कारवाईनंतर आता आयकर विभागाने एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीमधील एक फ्लॅट, गोव्यामधील मालमत्ता आणि दक्षिण मुंबईतील निर्मल इमारत यांचा समावेश असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. याआधी झालेल्या कारवाईनंतर अजित पवार यांनी ही सर्व कारवाई राजकीय हेतून केली जात असल्याचा आरोप केला होता. तसेच केवळ आपले नातेवाईक आहेत म्हणून काहींवर छापेमारी केली जात असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले होते.