Home > Politics > सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, अखेर भाजपने मान्य केलं, मात्र उकरुन काढला नवा वाद

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, अखेर भाजपने मान्य केलं, मात्र उकरुन काढला नवा वाद

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, अखेर भाजपने मान्य केलं, मात्र उकरुन काढला नवा वाद
X

सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली नव्हती. अशी भूमिका सातत्याने हिंदुत्व विचारसरणीच्या पक्षांनी घेतली आहे. खासकरून भाजप आणि शिवसेनेने. तर दुसरीकडे सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. असा दावा सातत्याने कॉंग्रेससह अनेक बुद्धीजीवी लोक करत असतात. तसे पुरावे देखील आहेत.

मात्र, हिंदुत्ववादी पक्ष सावरकर माफीवीर नव्हते. अशी भूमिका सातत्याने घेत आले आहेत. मात्र, आता देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह यांनी ही बाब मान्य केली आहे. मात्र, सावरकरांनी माफी मागितली होती. ही बाब मान्य करताना राजनाथ सिंह यांनी नवीन इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

तसं तर सावरकरांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एक वर्ग सावरकरांना 'माफीवीर' म्हणतो तर दुसरीकडे आरएसएस आणि भाजप सावरकरांची मोठ्या प्रमाणात स्तुती करतात आणि त्यांना 'वीर' म्हणतात. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सावरकरांविषयी नवीन 'ज्ञान' दिले आहे, ज्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

राजनाथ सिंह यांनी दावा केला आहे की, महात्मा गांधींनी सावरकरांना ब्रिटिश सरकारसमोर दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते आणि त्यानंतरच त्यांनी दया याचिका दाखल केली होती. महात्मा गांधी यांनी सावरकरांची सुटका करावी असं आवाहनही केले होत.

राजनाथ सिंह म्हणाले की, सावरकरांना बदनाम करण्यासाठी अशा गोष्टी सांगितल्या जातात की सावरकरांनी ब्रिटिशांसमोर दया याचिका दाखल केली होती. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन केले. या दरम्यान राजनाथ सिंह यांनी सावरकरांना पहिले संरक्षण तज्ज्ञ आणि त्याचबरोबर ते एक वाघ (शेर) होते. सावरकरांनी केलेल्या कामाचं त्यांनी यावेळी खूप कौतुक केले.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देखील सावरकरांचं कौतुक केलं ते म्हणाले, लोकांमध्ये अजूनही त्यांच्याबद्दल माहितीचा अभाव आहे. सावरकरांवर आधारित हे पुस्तक उदय महुकर यांनी लिहिले आहे. उदय माहूरकर हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचारवंत सावरकर यांनी भारताला "मजबूत संरक्षण आणि मुत्सद्दी तत्त्वज्ञान" सादर केले.

त्यांनी 20 व्या शतकातील संरक्षण आणि धोरणात्मक व्यवहारातील भारतातील महान आणि पहिले तज्ज्ञ म्हणून सावरकरांचे वर्णन केले. दिल्लीत सावरकरांवरील पुस्तकाच्या लोकार्पणवेळी संरक्षण मंत्री असेही म्हणाले की, मार्क्सवादी आणि लेनिनवादी विचारसरणीचे अनुसरण करणारे लोक सावरकरांवर फॅसिस्ट आणि हिंदुत्वाचे समर्थक असल्याचा आरोप करतात.

"भारताचे इतर देशांशी असलेले संबंध हे आपल्या सुरक्षेसाठी आणि राष्ट्रीय हितसंबंधांसाठी किती अनुकूल आहेत यावर अवलंबून असतात. इतर देशाचे सरकार कोणत्या प्रकारचे (विचाराचे) आहे हे महत्त्वाचे नाही. जोपर्यंत एखादा देश आपल्या हिताचा विचार करेल तोपर्यंत तो आपल्या देशाचा मित्र राहील.'' असे सावरकरांचे विचार असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, "सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, त्यात काही शंका नाही. कोणत्याही विचारधारेच्या चष्म्यातुन पाहून, राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे, अपमान करणे हे असे कृत्य आहे जे कधीही माफ केले जाऊ शकत नाही." आपल्या देशाच्या एका मोठ्या वर्गाला अद्याप त्याचे जीवन नीट समजलेले नाही. असा दावा देखील राजनाथ सिंह यांनी केला आहे.

Updated : 13 Oct 2021 12:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top