महाराष्ट्राच्या चार खासदारांना संसद रत्न...
२०२३ च्या संसद रत्न पुरस्कारासाठी १३ खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. या खासदारांमध्ये आठ लोकसभा आणि पाच राज्यसभेचे सदस्य आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या चार खासदारांचाही समावेश आहे.
X
दरवर्षी संसद रत्न पुरस्कार केंद्र सरकारकडून जाहीर केले जातात. यावेळी २०२३ साठी १३ खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती (S. Krishnamurti) यांच्या सह-अध्यक्षपदी असलेल्या प्रख्यात संसदपटू आणि नागरी समाजाच्या ज्यूरीने खासदारांना नामनिर्देशित केले आहे. ज्यूरीने विशेष पुरस्कार श्रेणी अंतर्गत दोन विभागांशी संबंधित स्थायी समित्या आणि एका प्रतिष्ठित नेत्याला नामनिर्देशित केले. या समितीमध्ये प्रतिष्ठित खासदार आणि सामान्य नागरिक यांचा समावेश आहे.
१७ व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून ते हिवाळी अधिवेशन २०२२ संपेपर्यंत प्रश्न, खाजगी सदस्यांची विधेयके आणि सदस्यांवरील चर्चेदरम्यानच्या त्यांच्या कामगिरीवर या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. २०२३ या वर्षासाठी लोकसभेतून काँग्रेसचे (Congress) अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary), भाजपचे (Bjp) विद्युत बरन महतो , डॉ. सुकांत मजुमदार(Dr. Sukant Majumdar), काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा (Kuldeep Rai Sharma), भाजपाच्या डॅा.हिना विजयकुमार गावित (dr. Hina Vijayakumar Gavit), गोपाळ शेट्टी (Gopal Shetty), सुधीर गुप्ता (Sudhir Gupta) आणि राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांचा संसदरत्न पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे राज्यसभेतून सध्याच्या सदस्यांमधून सीपीएमचे जॉन ब्रिट्स (CPM's John Brits), राजदचे मनोज झा (RJD's Manoj Jha) आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फौजिया खान (Fauzia Khan) यांची निवड करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे विश्वभंर प्रसाद निषाद (Vishwabhan Prasad Nishad) आणि काँग्रेसकडून छाया वर्मा (Chhaya Verma) यांना त्यांच्या कार्यकाळातील उत्कृष्ठ कामगिरीसाठी सेवानिवृत्त सदस्य श्रेणी अंतर्गत नामांकन देण्यात आले आहे. १७ व्या लोकसभेच्या सुरवातीपासून उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकित करण्यात आले आहे. १५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.