मोदींच्या वाढदिवशी झालेल्या विक्रमी लसीकरणावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला म्हणजे शुक्रवारी कोरोनावरील लसीकरणाचा विक्रमी आकडा नोंदवला गेला. यावरुन पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. गोव्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना अडीच कोटींच्या वर लोकांचे लसीकरण झाल्याने एका राजकीय पक्षाला ताप आला, या शब्दात मोदींनी टीका केली. पण आता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा रेकॉर्ड नोंदवला जावा यासाठी १५ ते २० दिवसांपासून देशभरात कमी प्रमाणात लसीकरण करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. "पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला लसीकरणाचा रेकॉर्ड करण्यात आला. जवळपास पावणे तीन कोटी लोकांना लसीचे डोस दिल्याचा दावा केला जातो आहे. मग असे विक्रमी लसीकरण आज आज, उद्या किंवा महिनाभर का होत नाही," असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी १५ ते २० दिवस लसीकरण कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांना आधीच लस दिली असती तर त्याचा जास्त फायदा झाला असता, पण पंतप्रधानांच्या वाढदिवसाला रेकॉर्ड करण्यासाठी १५ ते २० दिवस आधी लसीकरण कमी करण्यात आले, कोणत्याही व्यक्तीचा गौरव करण्यासाठी अशा प्रकारे कृत्य करणे अन्यायकारक असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.