Home > Politics > योगी आदित्यनाथ कुठून लढणार? मोदींच्या बैठकीत होणार निर्णय

योगी आदित्यनाथ कुठून लढणार? मोदींच्या बैठकीत होणार निर्णय

योगी आदित्यनाथ कुठून लढणार? मोदींच्या बैठकीत होणार निर्णय
X

देशातील पाच राज्यांच्या निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मनीपूर आणि गोवा राज्यात निवडणूका होणार आहेत.

भाजपसाठी उत्तर प्रदेश निवडणूक महत्त्वाची मानली जात असून निवडणूकांच्या तोंडावर भाजप मधील अनेक नेत्यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. त्यामुळे भाजपसाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. भारतीय जनता पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या सकाळी दहा वाजता भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातील पहिल्या तीन टप्प्यातील उमेदवारांच्या नावावर घोषणा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्यासह पक्षाध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील उपस्थित राहतील.

५ राज्यातील परिस्थिती…

उत्तर प्रदेशः

उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत १४ मे पूर्वी विधानसभा आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये झाल्या होत्या.

भाजप ३१२ जागा जिंकून सत्तेवर आला. सपा ४७, बसप १९ आणि कॉंग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी १९ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सीएम योगी हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

उत्तराखंडः

७० जागांच्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ २३ मार्च रोजी संपत आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले, तर विरोधी काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. त्रिवेंद्रसिंग रावत मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना चार वर्षांतच काढत भाजपने पहिल्यांदा तीरथसिंग रावत आणि त्यानंतर काही महिन्यांनी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री केले.

पंजाबः

पंजाब विधानसभेचा कार्यकाळ २७ मार्च २०२२ रोजी संपत आहे. ११७ जागा असलेल्या पंजाबमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७७ जागा जिंकून दहा वर्षानंतर सत्तेत परतली, तर शिरोमणी अकाली दल-भाजप युती केवळ १८ जागांवर राहीले. आम आदमी पार्टी २० जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले, पण चार वर्षांनंतर काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरच्या जागी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला ५९ जागांचा आकडा गाठावा लागेल.

मणिपूरः

ईशान्येकडील ६० जागांचे राज्य असलेल्या मणिपूरच्या विधानसभेचा कार्यकाळ १९ मार्च २०२२ रोजी संपत आहे. त्यापूर्वी राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. २०१७ च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत, भाजप २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. १७ आमदारांसह काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष ठरला. भाजपने एनपीपी, एलजेपी आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आणि एन बिरेंदर सिंग राज्याचे मुख्यमंत्री झाले.

गोवाः

४० जागांच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्च रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये झाल्या होत्या. १५ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण त्यांना सरकार स्थापन करता आले नाही. भाजपने १३ जागा जिंकल्या आणि MGP, GFP आणि दोन अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले. मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु १७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले.

Updated : 13 Jan 2022 9:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top