शिवसेनेतून काही लोक भाजपमध्ये येणार, नारायण राणे यांचा दावा
X
"सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे भाजपची सत्ता पाहिजे, येणाऱ्या निवडणुकीत गद्दारी अजिबात चालणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झाल ते आता खपवून घेणार नाही," असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. "गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच पण दुसरे काय करायला लावू नका" असा इशाराही नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका यामध्ये भाजपची सत्ता पाहिजे. जिल्हा परिषद निवडणुकीत तीन विरूद्ध एक आहोत, पण आता ४६ जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेत निवडून गेलेले पाहिजे, असे आवाहन राणे यांनी केले.
वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवा आणि नरेंद मोदी, अमित शहा, जे.पी.नडडा यांना दाखवून द्या की सिंधुदुर्ग जिल्ह्यात शंभर टक्के भाजप आहे, असे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे काय बोलतात ते तुम्ही चिपीमध्ये बघितले, पण मला शत प्रतिशत भाजप हवे आहे, असे म्हणत डिसेंबरमध्ये शिवसेनेतील काही लोक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असाही दावा राणे यांनी केला.