शिवसेनेच्या आक्षेपानंतर शिंदे गटाचे निर्णय बदलण्याचे संकेत
X
उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केल्यानंतर तब्बल ५ दिवसांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाने पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शिवसैनिक आहोत, अशी सुरूवात करत दीपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.
आम्ही शिवसेनेतच आहोत, पण फक्त आमचा वेगळा गट स्थापन केला आहे, कारण बाळासाहेबांच्या विचारांच्या दिशेने जाण्याचा आमचा आग्रह आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला होता, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत केसरकर यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर बोलताना आमदारांचे निलंबन हे बेकायदा असेल अशीही भूमिका त्यांनी मांडली. तसेच शिंदे यांच्या गटाकडे २/३ बहुमत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पण यावेळी शिवसेना बाळासाहेब गट स्थापन कऱण्याच्या निर्णयाला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे, असे त्यांना विचारले असता आक्षेप योग्य असेल तर गटाच्या नावाबाबत विचार करु असे त्यांनी सांगितले.
पण त्याचबरोबर केसरकर यांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणारे हल्ले मुख्यमंत्र्यांनी थांबवावे, असे आवाहन केले. शिवसैनिकांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश देणाऱ्या राऊतांवर कारवाई करणार का असा सवालही त्यांनी विचारला. राजकीय परिस्थिती स्थिर झाल्यानंतर महाराष्ट्रात परतणार आहोत, अशीही माहितीही त्यांनी दिली. तसेच शिंदे समर्थक आमदार हे कुणाच्याही दबावाखाली नाहीयेत, एकनाथ शिंदे हेच गटनेते आहेत, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.