२०२४ ला एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री- गजानन किर्तीकर
X
बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आगामी पालिका निवडणूकीनंतर मुंबई महानगर पालिकेवर आपला झेंडा फडकावेल. आणि आपल्या पक्षाचा महापौर बसवेल असा विश्वास शिंदे गटाच्या एका खासदाराने व्यक्त केला आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी आत्तापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिंदे गटानेही भाजपसोबत मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्रितरित्या होण्याची दाट शक्यता आहे. ते पाहता आगामी विधानसभा निवडणूकीनंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी विराजमान राहतील असा अंदाज शिंदे गटातील खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत ते एका कार्यक्रमात बोलत होते.
गजानन किर्तीकर यांनी केलेल्या या विधानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील ४० पैकी २० महापालिका शिंदे गटा जिंकणार असल्याचा विश्वास सुद्धा किर्तीकर यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा महापौर बसणार असल्याचे किर्तीकर यांनी सांगितले. तसेच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आसल्याचे सुद्धा गजानन किर्तीकर यावेळी म्हणाले. तर राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेचं विराजमान होतील असा विश्वास आणि आमची जिद्द असल्याचे गजानन किर्तीकर यांनी सांगितले.
गेली ४५ वर्ष मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले. त्यांनी मला विविध पदावर बसवले. उद्धव ठाकरे यांच्या काळात तीनवेळा उमेदवारी मिळाली. मात्र माझी उमेदवारी कापण्याची त्यांची आणि त्यांच्या जवळच्या लोकांची हिंमत झाली नाही. कारण त्यांच्याकडे ती हिंमत नव्हती. पण बाळसाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला त्यांनी बाजूला केले, अशी खंत गजानन किर्तीकर यांनी यावेळी बोलून दाखवली. एका नवीन व्यक्तीला केंद्रात मंत्रिपद दिले. तरीही शिवसेना सोडली नसल्याचे किर्तीकर म्हणाले. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत जाण्याचे ठरवले आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. कॉग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जावून उद्धव ठाकरे यांनी पक्षाची विचारधाराचं बदलली. ४० आमदारांनी खोक्यासाठी बंड केले नाही, तर माझ्याही मनात खदखद होती. त्यामुळे मीही बाहेर पडल्याचे गजानन किर्तीकर यांनी सांगितले.