राज्यसभा निवडणूकीत संजय पवार यांच्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांचा संजय राऊत यांना टोला
X
राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. तर भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावं घेत गद्दारी केली असल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेसाठी भाजपचे धनंजय महाडिक विरुध्द शिवसेनेचे संजय पवार असा थेट सामना रंगला होता. मात्र यामध्ये भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. त्यामुळे या पराभवाला शिवसेनेने अपक्षांना जबाबदार धरले. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, राज्यसभा निवडणूकीत ज्याप्रकारे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्याचा राग अपक्षांवर धरू नये. महाविकास आघाडीला पाठींबा देणाऱ्या अपक्षांना गद्दार म्हणत त्यांच्यावर अविश्वास दाखवू नये, असं मत एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.
तसंच पंकजा मुंडे यांना विधानपरिषद उमेदवारी न दिल्याने एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी खडसे म्हणाले की, मुंडे महाजन ही भाजपची ओळख होती. त्यांनी अनेकांना पदं वाटली. मात्र मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषद उमेदवारी न देता त्यांना डावलण्यात आलं, याचं दुःख आहे. तसंच ज्यांनी पक्षासाठी आयुष्य खर्ची घातले त्या कुटूंबातील व्यक्तीला म्हणजेच जीला ओबीसी नेत्या म्हणून लोक मानतात त्या पंकजा मुंडे यांना डावलण्याचा नेमका अर्थ काय? असं एकनाथ खडसे म्हणाले.