#ED सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ED ची नोटीसीनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ
X
नॅशनल हेराल्ड (national herald)प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावून 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर राजकीय वादळ उठले असून काँग्रेसने "आम्ही झुकणार नाही. सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, असे पलटवार केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी आरोप केला आहे की, ईडीने हे प्रकरण आधी बंद केले होते. राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजप कठपुतळी सरकारी तपास यंत्रणा वापरत आहे. यापूर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. आर्थिक व्यवहारांसह अनेक मुद्द्यांवर त्यांची चौकशी करण्यात आली.
इतनॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ती चुकीच्या पद्धतीने खरेदी करण्यात आली आणि काँग्रेस नेत्यांनी 2,000 कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. ईडीने 2014 मध्ये या प्रकरणाची सुरुवात केली होती. काँग्रेसच्या मते, यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा मिळवणे नसून धर्मादाय संस्था स्थापन करणे हा आहे.
सोनिया व राहुल गांधी यांच्यावर झालेला आरोप खोटा असून या कारवाईमागे केवळ सूडाची भावना असल्याचे काँग्रेस नेते व ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे. या प्रकरणात राहुल व सोनिया गांधी यांची चौकशी करुन ईडीला काहीही मिळणार नाही. तसेच, राहुल गांधी बाहेर आहेत. त्यामुळे चौकशीकरीता त्यांच्यासाठी आणखी वेळ मागणार असल्याचे सिंघवी म्हणाले.
सिंघवी यांनी मांडलेले मुद्दे
1. नॅशनल हेराल्ड प्रकरण 7-8 वर्षांपासून सुरू असून आतापर्यंत तपास यंत्रणेला यात काहीही मिळालेले नाही.
2. कंपनी मजबूत करण्यासाठी व कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी कंपनीच्या मालमत्तेचे इक्विटीत रूपांतरण केले गेले.
3. या इक्विटीमधून आलेला पैसा कामगारांना दिला गेला आणि हा व्यवहार पूर्ण पारदर्शकतेने झाला.
4. 7 वर्षांनंतर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हे समन्स पाठवले आहे. देशातील जनतेला सर्व काही समजते.
5. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा गैरवापर करून विरोधी पक्षांना घाबरवले जात आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये काँग्रेसने राहुल आणि सोनियांना पक्ष निधीतून 90 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. असोसिएट जर्नल्सची 2 हजार कोटींची मालमत्ता मिळवणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यासाठी गांधी परिवाराने नाममात्र 50 लाख रुपये दिले, असा आरोप स्वामींनी केला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
1938 मध्ये, काँग्रेस पक्षाने असोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL) ची स्थापना केली होती. या अंतर्गत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र काढण्यात आले. AJL वर 90 कोटींहून अधिक कर्ज होते आणि ते दूर करण्यासाठी यंग इंडिया नावाची आणखी एक कंपनी स्थापन करण्यात आली. यामध्ये राहुल आणि सोनियांची 38-38% भागीदारी होती. AJLचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले होते. या बदल्यात यंग इंडियाला AJLचे कर्ज भरण्याचे सांगण्यात आले. मात्र, जास्त शेअरहोल्डिंगमुळे यंग इंडियाच या कंपनीची मालक झाली. त्यानंतर AJLचे कर्ज चुकवण्यासाठी काँग्रेसने 90 कोटींचे कर्ज दिले. ते कर्जदेखील नंतर माफ करण्यात आले.