राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची विजयी आघाडी
X
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मोठी आघाडी घेतली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा मोठी आघाडी घेतल्याने द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांना ८१२ मतांनी मागे टाकले आहे. या निवडणुकीत एका मताचे मूल्य जास्त मोजले जात असल्याने मतांमधील हा फरक मोठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळपास तीन लाख मतांचा फरक दोन्ही उमेदवारांमध्ये आहे.
दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या १० राज्यांमधील मतांची मोजणी करण्यात आली आहे. यामध्ये अल्फाबेटिकली राज्यांची मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजपतर्फे द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर विरोधकांच्या आघाडीतर्फे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी नेत्या असल्याने अनेक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला होता. यामध्ये उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेतर्फे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपकडे असलेली मतं आणि इतर पक्षांनी दिलेला पाठिंबा या पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.