पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
X
पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या समर्थकांशी संवाद साधताना पक्षात आपली घुसमट होत असल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले. याच भाषणात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पांडवांच्या भूमिकेतून विचार करण्याचे आणि धर्मयुद्ध टाळण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर योग्य वेळ आली की योग्य निर्णय घेऊ असे सांगत त्यांनी आपण वेगळ्या मनस्थितीत असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा यांनी आपले नेते म्हणून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांचा उल्लेख केला. पण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा मात्र उल्लेख त्यांनी टाळला होता. यावर पत्रकारांनी विचारले असता आपण राष्ट्रीय स्तरावर काम करत असल्याने राज्याचा विषय येत नाही असेही स्पष्ट केले होते.
पंकजा यांच्या या भूमिकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण गुरूवारी मुंबईत पत्रकारांनी फडणवीस यांना यासंदर्भात विचारले तेव्हा फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच "पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली असताना मी बोलण्याची गरज नाही", असे उत्तर दिले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
पंकजा मुंडे या बंड करणार नाहीत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात कार्यालयात असणारी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर आणली आणि त्यातून पक्ष वाढवला. गोपीनाथ मुंडे यांचे एवढे मोठे योगदान असताना पंकजा मुंडे बंड करणार नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. भागवत कराड यांना न्याय मिळाला तेव्हा पंकजा यांच्यावर अन्याय झाला, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, पण पंकजा यांनी ज्या पद्धतीने या कार्यकर्त्यांना समजावले त्यावरुन त्या किती परिपक्व राजकारणी आहेत ते सिद्ध झाले, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पण त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक घडामोडीवर मोदी आणि शाह यांचे बारीक लक्ष असते, असे स्पष्ट करत चंद्रकांत पाटील यांनी कुणाला इशारा दिला याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.