रायगडच्या न्यायालयीन इतिहासात रात्री उशिरापर्यंत दोनवेळा झाले कामकाज
X
रायगड: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती, मात्र न्यायालयीन बाबींना उशीर झाल्याने रायगड दंडाधिकारी यांच्याकडे या प्रकरणी रात्री उशिरा सुनावणी झाली. रात्री सुनावणी झाल्याच्या घटनेकडे पाहिले तर रायगडच्या न्यायालयीन इतिहासात फक्त दोनवेळा रात्री सुनावणी झाली आहे. पहिली सुनावणी अर्णब गोस्वामी प्रकरणी अलिबागला तर दुसरी नारायण राणे यांच्या अटकेबाबत महाडमध्ये झाली.
सामान्यत: न्यायालयाचे कामकाज हे सायंकाळी पाच वाजता बंद होते. त्यानंतर शक्यतो न्यायालयातील न्यायदानाचे काम होत नाही. तसेच महत्वाचे काही असेल तर न्यायदान केले जाते. रायगड जिल्ह्यात रात्री उशिरा न्यायालय सुरू राहण्याच्या आजपर्यंत दोन घटना घडल्या आहेत. एक अर्णब गोस्वामी प्रकरणात आणि दुसरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीत. ह्या दोन्ही व्यक्ती महत्वाच्या असल्याने त्यांच्यासाठी न्यायालयात उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. मात्र महत्वाच्या व्यक्तींबाबत जशी तत्परता दाखवली जाते तशीच तत्परता ही सर्व सामन्यांसाठीही न्यायालयाने दाखवावी अशी चर्चा या दोन घटनांनंतर सुरू झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने त्याच्या विरोधात महाड मध्ये 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला आणि गदारोळ माजला. संगमेश्वर येथून रायगड पोलिसांनी राणे यांना अटक करून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना सायंकाळी महाड प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावून त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. खटल्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी रात्री उशिरा बारा वाजेपर्यत न्यायालय सुरू होते.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक झाली होती. रायगड पोलिसांकडून अटक , न्यायालयात जामीन आणि सुटका ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यँत चालली. अलिबाग तालुक्यातील कावीर येथील अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामीला मुंबईतून अटक करून अलिबाग येथे आणले होते. या खटल्यासाठीही रात्री बारा वाजेपर्यत न्यायालय सुरू ठेवण्यात आले होते.