शिवसेनेची बंडखोरांना ऑफर, काँग्रेसला काय वाटते?
X
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यात तयार आहे, असा संदेश संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना दिला आहे. पण बंडखोर आमदारांनी २४ तासात महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी केली तर त्यांच्या मागणीवर विचार होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
पण त्यांच्या या घोषणेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही तिन्ही पक्ष सोबत राहू आणि महाविकास आघाडीला मजबूत करू, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आमचे संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे
महाविकास आघाडी सरकारची निर्मिती महाराष्ट्राच्या विकासासाठी झाली आहे, पण महाराष्ट्रात गडबड होत आहे. राज्य सरकार पाडण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करीत आहे, असा आरोप खर्गे यांनी केला आहे. सरकार पाडण्यासाठीच शिवसेना आमदारांना भाजपने सुरतला नेलं असा आरोप त्यांनी केला. तसेच "महाविकास आघाडी सरकार एक मजबूत सरकार आहे. भाजप या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, हा भाजपचाच खेळ आहे, असा आरोपही त्यांनी केला. "भाजप विरोधी सरकार राहू नये यासाठी हे प्रयत्न आहे. राष्ट्रपती निवडणुकी दरम्यान महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे." असाही आरोप त्यांनी केला.