महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेनेनेच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम
X
विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकतेचा नारा दिला आहे. मात्र जालना जिल्ह्यात शिवसेना काँग्रेस आमने-सामने आल्याचे दिसून आले. तर कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत शिवसेना नेत्याने थेट काँग्रेस आमदाराचा पराभव केल्याने विधानपरिषद निवडणूकीआधीच महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जालना जिल्ह्यात आज सकाळ पासुन शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात सुरू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणूकीवरून जोरदार राडा झाला. त्यामुळे जालना जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच शिवसेनेच्या पॅनलने सर्वच जागा जिंकत काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दारूण पराभव केला. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपलं वर्चस्व कायम राहावं या साठी माजी मंत्री अर्जून खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या साठी ही सोसायटी निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. सकाळी मतदान प्रक्रीया सुरू झाल्यापासून खोतकर आणि गोरंट्याल आमने सामने आल्याने मोठा राडा झाला होता. त्यातच खोतकर समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप गोरंट्याल समर्थकांनी केल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फ़ौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दिवसभर बाचाबाची आणि गोंधळात झालेल्या या निवडणुकीत अखेर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या पॅनल चे १३ च्या १३ उमेदवार निवडून आल्याने काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना दोन मतदार संघातून पराभव पत्करावा लागला आहे. शिवसेना पॅनल चा दणदणीत विजय झाल्या नंतर या ठिकाणी गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी अर्जुन खोतकर यांनी गोरंट्याल यांनी आपल्याला ग्रामपंचायत क्षेत्रात निवडून येण्याचे चॅलेंज केले होते ते चॅलेंज आपण पूर्ण केल्याचं सांगत आपण काँग्रेस आणि भाजपा च्या पॅनल चा पराभव केल्याची मिश्किल टीका ही या वेळी अर्जुन खोतकर यांनी करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच नाव न घेता त्यांना ही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.