Home > Politics > ही तर जनतेची फसवणूक, पेट्रोल डिझेलच्या करकपातीनंतरही बाळासाहेब थोरात यांची टीका

ही तर जनतेची फसवणूक, पेट्रोल डिझेलच्या करकपातीनंतरही बाळासाहेब थोरात यांची टीका

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र या करकपातीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

ही तर जनतेची फसवणूक, पेट्रोल डिझेलच्या करकपातीनंतरही बाळासाहेब थोरात यांची टीका
X

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डिझेलचे दर ३ तर पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी होणार आहेत. मात्र या निर्णयानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पेट्रोल डिझेलच्या करकपातीवर टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय बदलण्याचे काम सुरू केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला. पण तो घेण्याआधी त्याचे फलित काय? हे तपासणे आवश्यक होते. हा निर्णय जेव्हा पूर्वी झाला. तेव्हा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत व्यवस्थित चालते आहे का? हे जर त्यांनी तपासले असते, तर हा निर्णय घेताना त्यांनी चारदा विचार केला असता, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

तसेच शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा समाचार घेताना म्हणाले की, पेट्रोलवरचे दर कमी केले हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूने विजेचे दर मात्र 20 टक्क्याने वाढवले आणि हे सांगायला ते जाणीवपूर्वक विसरले. एका बाजूने दिलासा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूने जाणीवपूर्वक लोकांच्या खिशातून पैसा काढून घ्यायचा असा हा सगळा प्रकार दिसतो. मंत्रिमंडळ विस्तार गेल्या पंधरा दिवसापासून रखडलेला आहे. आपापसात वाद आहेत आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मुख्यमंत्री गडचिरोलीला गेले मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पूरस्थिती मध्ये जवळपास ९० पर्यंत बळी गेलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा दुर्दैवाने या नव्या सरकारने घेतलेला दिसत नाही, कुठेही त्याबाबतीत जागरूकता दिसत नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपये अनुदान देण्याता निर्णय आम्हीच घेतलेला होता. त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू झाली होती. लोकशाही धोक्यामध्ये आहे. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ही लढाई एकत्रित लढत होतो, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Updated : 15 July 2022 11:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top