राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात एसी-एसटी कायद्यान्वये तक्रार दाखल
X
मुंबई : आर्यन खान प्रकरणी (Aryan Khan Drug Case) NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Samir Wankhede) यांच्यावर दररोज वेगवेगळे आरोप करत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आता कायदेशीर लढाईत अडकल्याचे दिसत आहे. NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध एसी-एसटी कायद्यान्वये तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी वानखेडे कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे, त्यावर त्यांना आज उत्तर सादर करायचे आहे.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी ओशिवरा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत मंत्री मलिक यांच्या विरोधात तक्रार केली. कुटुंबाच्या जातीबाबत खोटे आरोप केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने काल महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना ज्ञानदेव यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याला उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेत. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने मलिक यांना आज प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेत.
न्यायमूर्ती जामदार म्हणाले, 'तुम्ही (मलिक) उद्यापर्यंत उत्तर दाखल करा. आपण Twitter वर उत्तर देऊ शकत असल्यास, आपण येथे देखील उत्तर देऊ शकता'.सोबतच मलिक यांना फिर्यादी (ज्ञानदेव वानखेडे) विरुद्ध कोणतेही विधान करण्यापासून न रोखता हे निर्देश देण्यात आल्याचे समजतंय.
ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडणारे अधिवक्ता अर्शद शेख यांनी न्यायालयाला सांगितले की मलिक यांच्याकडून दररोज काही खोटे आणि बदनामीकारक विधान केले जात आहेत. यासोबतच सोशल मीडियावर टिप्पणी केली जाते, जी आणखी अपमानास्पद आहे. शेख यांनी युक्तिवाद केला की, "आज सकाळीही मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या मेहुण्याविरुद्ध ट्विट केले.''
दरम्यान ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याकडून 1.25 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मलिक यांनी त्यांचा मुलगा समीर वानखेडे आणि कुटुंबाविरोधात पत्रकार परिषद आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.