Home > Video > सामाजिक द्वेषाचा अजेंडा भाजपवरच उलटला आहे का?

सामाजिक द्वेषाचा अजेंडा भाजपवरच उलटला आहे का?

सामाजिक द्वेषाचा अजेंडा भाजपवरच उलटला आहे का?
X

भाजपच्या प्रवक्ते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यांनी सत्तेत असलेल्या मोदी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. कतार, युएई, कुवेत आणि इराणनंतर आणखी काही मुस्लिम राष्ट्रांनी भारताविरोधात नाराजी व्यक्त करत आपला निषेध नोंदवला आहे. यामध्ये जॉर्डन, ओमान, सौदी अरेबिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बहरिन, इंडोनेशिया, मालदिव यांचा समावेश आहे. मोदी सरकारने स्पष्टीकरण देताना या लोकांच्या भूमिकेचा सरकारशी संबंध नाही असे म्हटले आहे. पण जगभरातील मुस्लिम राष्ट्रांसह इतरही देशांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे वक्तव्य म्हणत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे भारताची प्रतिमा देखील मलिन झाली आहे. एवढेच नाही तर गेल्या ८ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी अरब राष्ट्रांसोबत संबंध सुधारण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, त्याच्यावरही परिणाम झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले आहे.

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षाने निलंबित केले आहे, पण त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता वाढू लागली आहे. एकीकडे भाजप सरकारची कोंडी झालेली असताना माध्यमांचा गैरवापर करण्याचा आरोपही त्यांच्यावर होतो आहे. एवढेच नाही तर मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर संघाचा अजेंडा राबवण्याचे काम सुरू झाल्याची टीकाही होते आहे. नुपूर शर्मा यांचे वक्तव्यही याच अजेंडाचा भाग असल्याची टीका संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे.

एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारला भारताची धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशी ओळख कायम ठेवायची असेल पंतप्रधान मोदींना आपले मौन सोडावे लागेल, अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि विरोधी पक्ष व्यक्त करत आहेत.

Updated : 7 Jun 2022 7:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top