मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना जाहीर ग्वाही
X
जनतेसाठीच्या विकासकामांच्या आड कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. नागपूर मेट्रोच्या महत्त्वाच्या टप्प्याचे शुक्रवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनानंतर भाषणात मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवसेनेचे काही नेते महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात खोडा घालत असल्याची तक्रार केली होती. वाशिम जिल्ह्यातील एका कामाचा उल्लेख गडकरींनी केला होता. तसेच अधिकारी आणि कंत्राटदार यांना लोकप्रतिनिधी त्रास देत असल्याची तक्रार केली होती. याच पत्राचा उल्लेख गडकरी यांनी मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात केला. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नितीन गडकरी प्रेमाने बोलतात पण पत्र मात्र कठोर लिहिता, असा टोला त्यांनी लगावला. गडकरी हे कर्तव्यकठोर आहेत तसे आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. शिवसेना प्रमुखांच्या शिकवणुकीप्रमाणे जनतेशी कधीही गद्दारी कऱणार नाही, जनतेच्या कामात अडथळा येऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.