'त्या' फोटोवर खासदार श्रीकांत शिंदे यांचा खुलासा
X
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार करत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादीने एक फोटो ट्विट केला होता. पण आता त्या फोटोवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तो फोटो मंत्रालयातील नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरातला फोटो आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच एकनाथ शिंदे आणि आपली लोकांना भेटण्याची ती निमयित जागा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पण जो फोटो व्हायरल करण्यात आला त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांचा बोर्ड पाठीमागे ठेवण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्यासाठी तो बोर्ड होता. पण बोर्ड मागे आहे याबाबत आपल्याला माहिती नव्हती, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांसारखे एकनाथ शिंदे हे एका ठिकाणी बसून काम करत नसल्याने त्यांना जिथे जिथे शक्य असेल तिथून ते काम करतात. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा बोर्ड ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण दोनवेळा खासदार झालेलो आहेत. त्यामुळे कुठे बसायचे, कोणत्या खुर्चीवर बसायचे हे आपल्याला समजते, त्यामुळे विरोधकांनी पराचा कावळा करु नये असाही टोला त्यांनी लगावला आहे. लोकांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा कामांचा धडाका लावला आहे ते पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळूही सरकली आहे, म्हणून असे किरकोळ मुद्दे उपस्थित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला शिंदे यांनी लगावला आहे.
दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात अनेक राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले होते. या नेत्यांच्या भेटी ह्या राजकीय चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी देखील मुख्यत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते, त्यावेळी त्यांचे श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचे फोटो देखील व्हायरल झाले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचीही चर्चा आहे.