परमबीर सिंहांच्या जवळच्या व्यक्तीवर बड्या मंत्र्याची विकेट काढण्याची होती जबाबदारी, तक्रारदारचा आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पण एवढेच नाही तर राज्य सरकार अस्थिर करण्याच्या कटात परमबीर यांचा मित्र सहभागी होता, असाही आरोप या प्रकरणात झाल्याने त्यांच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत.
X
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर मुंबईत खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संजय पुनामिया या उद्योजकासह काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. संजय पुनामिया हा परमबीर सिंह यांचा जवळचा मित्र मानला जातो. एवढेच नाही तर राज्यातील एका बड्या मंत्र्याची विकेट काढण्याची जबाबदारी केंद्रीय नेत्याने संजय पुनामियावर सोपवली होती, अशी माहिती स्वत: संजय पुनामिया यानेच आपल्याला सांगितली होती, असा आरोप खंडणीची तक्रार दाखल करणाऱ्या श्याम सुंदर अग्रवाल यांनी केला आहे. त्यासंदर्भातले मोबाईल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे आणि त्यांनी ते पोलिसांच्या हवाली देखील केले आहे.
बड्या मंत्र्याची विकेट काढण्याची सुपारी
परमबीर सिंह यांनी १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर पुढे काय घडणार आहे याची माहिती संजय पुनामिया याला आधीच असायची, असा आरोप तक्रारदार अग्रवाल यांनी केला आहे. अग्रवाल आणि संजय पुनामिया यांच्यात बांधकाम व्यवसायातील भागीदारीतून वाद निर्माण झाला होता. त्यासंदर्भात वाद मिटवण्यासाठी २३ मार्च २०२१ आणि ३० मार्च २०२१ या दोन दिवशी मुंबईत दोघांची बैठक झाली होती. २३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत संजय पुनामिया याला परमबीर सिंह आणि डीसीपी अकबर पठाण यांचे सतत फोन येत होते. तसेच परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या आरोपांनतर सीबीआय चौकशी सुरू होणार आहे, NIA राज्य सरकारच्या ४ ते ५ मंत्र्यांची चौकशी करणार, त्यामुळे ते मंत्री आणि सरकार अडचणीत येणार आहे, अटकेत असलेला सचिन वाझे आपल्या संपर्कात आहे, केंद्रीय नेत्याच्या आदेशावरुन आपण स्वत: एका बड्या मंत्र्याची विकेट घेण्याची जबाबदारी घेतली आहे, राज्य सरकार लवकरच पडेल, परमबीर सिंह पुन्हा मुंबईचे पोलीस आयुक्त होतील किंवा त्यांना केंद्र सरकार त्यांना मोठे पद देणार आहे, असेही संजय पुनामियाने सांगितल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे. या बैठकीचे अग्रवाल यांनी फोन रेकॉर्डिंग केले आहे, पोलिसांनी या पुराव्याच्या आधारे पुनामिया याला अटक केली आहे.
परमबीर सिंहांवर खंडणी घेतल्याचा आरोप
ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह यांनी त्यांचा जवळचा मित्र संजय पुनामिया याच्या माध्यमातून आपल्याला धमकावून कोट्यवधींची खंडणी लाटली, असा आरोप या प्रकरणातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल या बिल्डरने केला आहे. एवढेच नाही तर आपल्याविरुद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी २० कोटी रुपयांची मागणीही केली होती, असा गंभीर आरोप देखील अग्रवाल यांनी केला आहे.
परमबीर सिंह यांनी बंगल्यावर बोलावून धमकी दिल्याचा आरोप
अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीमध्ये थेट परमबीर सिंह आणि उद्योजक संजय पुनामिया यांच्य़ावर आरोप केले आहेत. अग्रवाल यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, श्यामसुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया हे काही वर्षांपूर्वी बांधकाम क्षेत्रात भागीदार म्हणून काम करत होते. पण कालांतराने त्यांच्या वाद झाले आणि आर्थिक देवाणघेवाणीवरुन वाद होऊन त्यांनी भागीदारी तोडली, पण त्यानंतर संजय पुनामिया यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकून तुरुंगात टाकले. आपण तुरुंगात असताना आपला पुतण्या शरद याला परमबीर सिंह यांनी एका व्यक्तीमार्फत त्यांच्या कोपरी येथील बंगल्यावर बोलावून घेतले होते. त्यावेळी तिथे परमबीर सिंह, पराग मणेरे, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल, मनोज घोटकर हे हजर होते, असा दावा अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. पराग मणेरे यांनी आपल्या विरूद्ध एमसीओसी प्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी शरद याच्याकडे २० कोटी रूपयाची मागणी केली, एवढेच नाही तर त्याला मारहाणही केली होती, असा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.
मारहाण करुन ते थांबले नाहीत तर त्यावेळी परमबीर सिंह यांनी स्वतः "भाई संजय का मॅटर जल्दी सलटा दो" असे धमकावून सांगितले होते, असाही आरोप त्यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांची दहशत दाखवत खंडणी वसुली?
एवढेच नाही तर संजय पुनामिया याने परमबीर सिंग यांच्या नावाने ९ कोटी रुपये खंडणी वसुल केली, तसेच भाईंदरमधील मालमत्ता सुनील मांगीलाल जैन यांच्या नावावर करुन घेतली, असाही आरोप अग्रवाल यांनी केला आहे. गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये संजय पुनामिया हा पोलिसांसाठी सेटलमेंट करायचा असाही आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
परमबीर सिंहांना मुंबईचे पोलीस आयुक्त करण्याचा निर्णय २०१८ मध्येच ?
परमबीर सिंह यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून फेब्रुवारी २०२०मध्ये नियुक्ती झाली. पण त्यांच्या नियुक्तीची माहिती संजय पुनामिया याला त्याच्या काही महिने आधीच होती, असेही या तक्रारीवरुन दिसते आहे. कारण श्याम सुंदर अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीमध्ये एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. परमबीर सिंह यांची जुलै २०१८मध्ये अँटी करप्शन ब्युरो, मुंबई इथे बदली झाली. त्यानंतरही संजय सुनामिया याने परमबीर सिंह आता लवकरच मुंबईचे पोलीस आयुक्त होणार आहेत, तेव्हा तुला बघून घेतो, अशी धमकी दिल्याचे अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये परमबीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झाले. तेव्हापासून संजय पुनामिया याने आपल्याला पुन्हा आपल्या स्टाईलने वेगवेगळया गुन्हयात अडकविण्याची धमकी देण्यास आणि खंडणी मागण्यास सुरूवात केल्याचा आरोपही अग्रवाल यांनी केला आहे.
इतर पोलीस अधिकाऱ्यांनीही कोट्यवधींची खंडणी घेतल्याचा आरोप
परमबीर सिंह मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर मार्च २०२१मध्ये आपले मीरा भाईंदरचे घर आणि ऑफिस तसेच विलेपार्ले येथील घरी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक आशा कोराके यांनी धाड टाकली. तसेच अटक टाळण्यासाठी आपल्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा एकाच दिवसात ५० लाखांची सोय करत आपण अटक टाळली, असे अग्रवाल यांनी सांगितले आहे. पण त्यानंतर डीसीपी अकबर पठाण यांनी संजय पुनामिया व परमबीर सिंह यांच्या काही प्रलंबित मागण्या पुर्ण केल्या नाही तर श्याम सुंदर यांना अटक करावी लागेल, अशी धमकी आपला पुतण्या शरद याला दिली होती, असा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.
परमबीर सिंह यांची बदली झाली असल्याने आपल्या तक्रारीची दखल पोलीस घेतील म्हणून आपण पुराव्यानिशी तक्रार करत असल्याचे अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. या एकूणच प्रकरणात आता परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत असे दिसते आहे.