"आम्ही फिल्डवर जाऊन काम करायचो" चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
आमच्या कार्यकाळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही फिल्डवर उतरून काम करायचो असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते .
X
राज्यात सध्या अनेक जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती आहे. आमच्या कार्याकाळात जेंव्हा राज्यात अशी परिस्थिती निर्माण व्हायची तेंव्हा आम्ही फिल्डवर जाऊन, बोटीत बसूनच निर्णय घ्यायचो. प्रशासनाला आवश्यक सुचना देऊन कामाला लावायचो. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी देखील डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
2019 ला जेव्हा महापूर आला तेव्हा 15 दिवस पाणी ओसरले नव्हते. त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस थेट फिल्डवर जाऊन काम करत होतो. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही संबधित प्रशासनाला सुचना देत होतो. त्यावेळी आमच्यावर काँग्रेसकडून टीका होत होती. आता तुम्ही सत्तेत आहात, तात्काळ निर्णय घ्या, लोकांना मदत करा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
सोबतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सुचना द्यायला हव्या असं पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. अनेक घरं पाण्याखाली गेले असताना आमचे मुख्यमंत्री मात्र मातोश्रीत बसले आहेत. अशी टीका पाटील यांनी केली.
हा राजकारणाचा विषय नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या विभागाशी बोललं पाहिजे. त्यांना आवश्यक सुचना करायला हव्यात. या कठीण परिस्थितीत आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत असंही पाटील यांनी म्हटले आहे.