सामनातील टीकेला चंद्रकांत पाटील यांचे खोचक उत्तर
X
राज्यसभा निवडणूकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेनेने सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला. त्याला प्रत्युत्तर देतांना चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला.
राज्यसभा निवडणूकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. त्यापार्श्वभुमीवर सामनातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यामध्ये भाजपने या निवडणूकीत काळ्या पैशाचा वापर केल्याचा आरोप रोखठोक सदरात केला. त्याबरोबरच भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्यांना उमेदवारी दिली. मात्र पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना डावलले जात असल्याचे म्हटले. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला. ते देहू येथे बोलत होते.
सामनात पंकजा मुंडे यांना डावलले असल्याचे म्हटले आहे. त्यावर प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, मी सामना वाचतही नाही आणि त्याची दखलही घेत नाही. तसेच पंकजा मुंडे यांची काळजी घेण्यास भाजप सक्षम आहे. कारण त्या प्रत्येक भाजप नेत्याची मुलगी आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची काळजी घेण्यास सक्षम आहोत. बाकी कोणी काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
नाचता येईना अंगण वाकडे
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आधीच पराभव दिसला होता. त्यामुळे त्यांची स्क्रिप्ट आधीच तयार झाली होती. त्या स्क्रिप्टनुसार प्रत्येक नेता बोलत होता. याबरोबरच त्यांचं बरं आहे की, आपापसात भांडले तरी दिवसभर ते एकच वाक्य बोलत असतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच नाचता येईना अंगण वाकडे अशी टीका सुप्रिया सुळे यांच्यावर केली.