छगन भुजबळ - देवेंद्र फडणवीस भेट, राजकीय चर्चेला उधाण
X
राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना महत्त्व आहे. या भेटींनंतर राजकीय चर्चा देखील सुरू होतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच दोन मोठ्या नेत्यांची भेट चर्चेचा विषय ठरते आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गुरूवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळ यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
"आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. सोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते."
असे भुजबळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने राज्य सरकार हे आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर भुजभळ यांच्यासह सत्ताधारी पक्षांमधील सर्वांनी राजकीय आरक्षण जाण्यास केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोप केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. आता या भेटीनंतर ओबीसींच्या राजकीय आऱक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे मानले जात आहे.