Home > Politics > माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ची क्लीनचीट?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ची क्लीनचीट?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI ची क्लीनचीट?
X

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात CBI ने अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिल्याची माहिती मिळत असल्याची बातमी टीव्ही 9 आणि साम टीव्हीनी दिली आहे.

CBI च्या प्राथमिक तपासात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याची माहिती मिळत असल्याचे या बातमीमध्ये म्हटले आहे. 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या CBI च्या 65 पानी अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचीट मिळाल्याची माहिती मिळते आहे. उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी हा अहवाल तयार केला आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांप्रकरणी आतापर्यंत प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत देशमुख यांच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नसल्याने त्यांच्याविरोधातले आरोप सिद्ध होत नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख यांची चौकशी थांबवण्यात यावी, तसंच पुढची कारवाईसुद्धा थांबवावी, असेही सीबीआयच्या प्राथमिक अहवालात म्हटले असल्याचे या बातमीमध्ये म्हटले आहे.

CBI च्या या क्लिनचिटमुळे आता ED ची कारवाई थांबते का ते पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ED ने अनिल देशमुख यांना याप्रकरणात आतापर्यंत 5 पाचवेळा समन्स बजावले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानुसार निलंबित एपीआय सचिन वाझे क्राईम इंटिलिजन्सचं युनिटचे प्रमुख होते. त्यांना देशमुख यांनी दर महिन्याला बार आणि हॉटेल चालकांकडून 100 कोटी रुपये वसूल करायला सांगितलं होते, तसेच पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांना क्लिन चीट मिळाल्यास त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर काय कारवाई होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 29 Aug 2021 5:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top