भाजपवर पुन्हा नामुष्की, आमदाराला केले निलंबित
X
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपसह मोदी सरकारची प्रतिमा जगभरात मलीन झाली. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपच्याच आणखी एका आमदाराने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे, यानंतर मोठा तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी भाजप आमदार टी राजा सिंह यांनी अटक केली आहे.
दरम्यान भाजपने टी राजा यांच्यावर कारवाई केली आहे, त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. टी राजा यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन भूमिका घेतल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे भाजपने आपल्या पत्रात म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांना पक्षातून का काढून टाकण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीसही त्यांना बजावण्यात आली आहे तसेच त्यांना १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
भाजप आमदार टी राजा सिंह यांचा एक व्हिडीओ श्रीराम चॅनल तेलंगणा या युट्यूब चॅनलवरून अपलोड करण्यात आला होता. 10 मिनिट 27 सेकंदाच्या या व्हिडीओचे शीर्षक फारुखी के आँख का इतिहास सुनिए असे होते. त्या व्हिडीओत गोशामहलचे आमदार टी राजा सिंह हे स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुखीसंदर्भात बोलत होते. हा व्हिडीओ सोमवारी रात्री अपलोड करण्यात आला होता. यामध्ये त्यांनी नुपूर शर्मा यांचे नाव न घेता त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे हैद्राबादमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सोमवारी रात्री अनेक ठिकाणी आंदोलकांनी आमदार टी राजा यांना अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे अखेर टी राजा यांना पोलिसांनी अटक केली आहे.
टी राजा सिंह यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. तर नुपूर शर्मा यांच्यापाठोपाठ आणखी एका भाजप नेत्याने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपची कोंडी झाली आहे.