Home > Politics > मोदी-शरद पवार भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान

मोदी-शरद पवार भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान

मोदी-शरद पवार भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
X

राज्यातल महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास तासभर ही चर्चा झाली. नेमकी कोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा झाली असे जाहीर करण्यात आलेले नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहकारी बँकांच्या प्रश्नांवर ही भेट झाल्याचे सांगितले.

तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात विचारले तेव्हा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी पंतप्रधानांना विविध पक्षांचे नेते भेटत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या भेटीत सहकार, कृषी कायदे यावर चर्चा झाली असू शकते असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पण देवेंद्र फडणवीसही दिल्लीमध्ये आहेत. त्यांनीही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचे पत्रकारांनी विचारले असता सहकाराच्या मुद्द्यावर या भेटीगाठी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पण ज्यावेळी पत्रकारांनी दिल्लीतील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारच्या स्थिरतेबाबत विचारले तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना सत्तेत एकत्र राहणे हा त्यांचा नाईलाज आहे, त्यामुळे येत्या काळात राज्यात काही मोठ्या घडामोडी घडतील असे दिसत नाही, असे विधान केले आहे. त्यामुळे शऱद पवार – मोदींच्या भेटीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरील संकट टळले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Updated : 17 July 2021 4:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top