पंकजा मुंडे यांचा वाढदिवस, परळीत बॅनरबाजी, भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
X
बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या म्हणजे 26 जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांना धीर
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर राज्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं होते. पण त्यानंतर खुद्द पंकजा मुंडे यांनी वरळी इथल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला होता.
पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची नाराजी
पंकजा मुंडे यांनी मुंबईत या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढत त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. यानंतर आता पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या बॅनरवरुन समर्थकांनी नाराजी दाखवण्यास सुरुवात केली आहे.
एकाही भाजपच्या नेत्याचा फोटो नाही
पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र, या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्वीकारलेले नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे.