मोदींनी कारवाई केली तरी बेहत्तर, शिवसेनेची साथ सोडणार नाही, भाजपच्या खासदाराच्या वक्तव्यानंतर खळबळ
X
अहमदनगर: एकीकडे राज्यात शिवसेना विरोधात भाजप असा वाद रंगला असताना भाजप खासदार सुजय विखे यांनी भाजप ची साथ सोडणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे. 'नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना मी एकट सोडणार नाही, माझ्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली तरी चालेल, एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारवाई केली तरी चालेल, पण मी शिवसैनिकांना वार्यावर सोडणार नाही' असं वक्तव्य भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. या वक्तव्याने सुजय विखे यांनी एक प्रकारे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मान्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच या वक्तव्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरलेली आहे.
दरम्यान, हे वक्तव्य आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी केलं आहे. त्यामुळं विखे आगामी जिल्हा परिषदेच्या तोंडावर पक्षविरहीत विखे फॅक्टर राबवत आहे का? कारण या अगोदर काँग्रेस मध्ये असताना विखे यांनी जिल्हा परिषद निवडणूकीत स्वपक्षातील नेत्यांना बाजूला ठेवत सत्ता ताब्यात घेतली होती. त्यामुळे विखे पुन्हा तोच पॅटर्न राबवत आहेत का अशी कुजबूज सुरू झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून खासदार विखे यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच मेळाव्यांचे आयोजन सुद्धा त्यांनी केले होते. पारनेर येथे अशा पद्धतीच्या मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, या मेळाव्याला भाजपमधील नाराज असलेले दोन जिल्हा परिषदचे सदस्य यांनी पूर्वी विखेंवर टीका केली होती. हे देखील उपस्थित होते. विखे यांनी त्यांची मनधरणी करत, त्यांच्या घरी जाऊन चर्चा केल्यानंतर झालेल्या सभेला नाराज झालेले सदस्य सुद्धा यावेळी उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, 'आज डॉ. सुजय नगर जिल्ह्याचा खासदार आहे, त्यामध्ये 50 टक्के वाटा हा नगरच्या शिवसेनेचा आहे, हे मी ठामपणे सांगतो. मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये माझं एकही वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधात नाही, मातोश्रीच्या विरोधात नाही. शिवसेनेच्या विरोधात नाही. शिवसैनिकांचे विरोधात नाही, किंवा शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात नाही. एवढच काय, कुठल्याही शिवसेनेच्या तालुक्यात अध्यक्षाच्या विरोधातही नाही. आजही माझं मत हेच आहे, राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचे काम महाराष्ट्रात करत आहे. राष्ट्रवादी शिवसेना संपवण्यासाठी सत्तेत आले आहे .
याचा परिणाम कालच्या निवडणुकीत दिसलाच आहे. माननीय पवार साहेबांनी राज्यसभा निवडणुकीनंतर जे वक्तव्य केलं, त्यावरून असे दिसते की, 'पवार साहेबांना निकाल पूर्वीच माहिती होता, व त्यांच्यामुळेच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात मान खाली घालावी लागली. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले, त्याचं मला काही वाईट वाटलं नाही. उलट शिवसेनेसोबत फक्त पारनेर तालुक्यातच नाही, तर नगर जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक व्यक्ती हा शिवसेनेच एकनिष्ठ राहील, हे मी आज एक खासदार म्हणून ठामपणे सांगतो.
माझ्यावर फडणीस यांनी कारवाई केली, तरी चालेल. नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली, तरी चालेल. पण मी या शिवसैनिकांना एकटं सोडणार नाही, हे आज ठामपणे सांगत आहे. कारण मी नगर जिल्ह्याचे राजकारण ओळखतो,' असेही विखे म्हणाले.