ज्या दिवशी बोलेन तेव्हा अनेकांना ब्लड प्रेशरचा त्रास होईल - नितेश राणे
X
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची सुटका झाली आहे. यानंतर नितेश राणे यांनी सावंतवाडीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. " मला कोणी अटक करू शकले नाही, माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः सरेंडर झालो," अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. आता या पुढची दिशा काय असा सवाल पत्रकारांनी विचारला तेव्हा, "थोडे दिवस आता आराम करणार आहे, त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना "ब्लड प्रेशर"चा त्रास होईल हे मात्र निश्चित" असा इशाराही त्यांनी दिला.
आपण कधीही फरार झालो नव्हतो, पोलीस जेव्हा जेव्हा बोलावत होते तेव्हा त्यांच्यापुढे हजर राहून सहकार्य केले, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. जेव्हा सरकार पडायची वेळ येते तेव्हा ईडीवर आरोप करायचे, असा टोलाही त्यांनी लगावला. गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने सोपवली असल्याने आपण तिकडे जाणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.