"भाजपाच्या ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश", अतुल लोंढे यांनी सादर केले पुरावे
X
नागपूर : ड्रग्जच्या काळ्या धंद्यात भाजपाचे नेते आणि भाजपाशी संबंधित लोकांचे मोठे रॅकेट आहे, देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचा गोरखधंदा सुरू असून त्याच्याशी संबंध असलेल्या मनिष भानुशाली, के. पी. गोसावी, रविंद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट काम करत आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. या रॅकेटमागील मास्टर माईंड कोण आहे, हे जनतेसमोर यावे यासाठी या सगळ्यांना अटक करावी आणि EOW आणि क्राईम ब्रँचमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणीही अतुल लोंढे यांनी केली आहे.
"गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टवर ३००० किलो एवढा देशातील सर्वात मोठा ड्रगसाठा सापडला आहे, याची किंमत २१ हजार कोटी रुपये आहे. देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचे एक मोठे षडयंत्र असून यात भाजपाचे नेते, भाजपाशी संबंधित लोकांचा सहभाग आहे. त्यामुळेच मुंद्रा पोर्टवरील या कारवईवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मुंबईत NCBच्या मार्फत क्रूझवर रेड टाकून काही ग्रॅम ड्रग्ज पकडून हे प्रकरण तापवत ठेवले गेले, असा आरोपही लोंढे यांनी केला. मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज व मुंबईतील NCBची कारवाई यात काही समान धागेदोरे आहेत. के.पी. गोवासी, मनिष भानुशाली व एनसीबीचे समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे, असा दावाही लोंढे यांनी केला आहे.
"२१ सप्टेंबरला मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज पकडले गेले त्यानंतर २२ सप्टेंबरला के पी. गोसावी व भानुशाली गुजरामध्ये पोहोचले व गुजरातचे मंत्री किरिटसिंह राणा यांना भेटले.. लल्लन टॉप या वेब पोर्टलाला मुलाखत देता देता मुझे कुछ काम था मुंद्रा म्हणत तो थांबतो...आणि मनिष भानुशाली ३ ऑक्टोबरला एक व्हिडिओ टाकून काम हो गया असे म्हणतो... काम हो गया हा संदेश त्याने कोणाला दिला व कोणते काम झाले याचा उलगडा झाला पाहिजे," अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.
मुंद्रा अदानी बंदरावरील ड्रग्द, NCBची मुंबईतील रेड आणि ५० लाख रुपयांची देवाण घेवाण झाली (खंडणी) अशी माहिती सॅम डिसुझाने दिली होती, असे सांगत लोंढे यांनी काही पुरावेही मांडले आहेत. "या सर्व प्रकरणात एक इनोव्हा कार वापरण्यात आली, त्या इनोव्हा कारचा नंबर MH 12 JG 3000 असून ही इनोव्हा कार रविंद्र कदम यांच्या नावावर आहे. यासाठी जो पत्ता दिलेला आहे तो कराडचा आहे. कारच्या मालकाचे नाव रविंद्र कदम, पत्ता- ८१५, माणिक चौक, उंब्रज, तालुका कराड, जि. सातारा असा नोंदलेला आहे. पण आम्ही माहिती घेतली असता या पत्त्यावर रविंद्र कदम नावाचा कोणी व्यक्ती रहात नाही हे उघड झाले आहे. हा रविंद्र कदम कोण आहे, ज्या रविंद्र कदमची कार आहे तो यातील मास्टर माईंड आहे की प्यादे आहे किंवा त्याचा वापर केला गेला आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे. ही गाडी त्या ठिकाणी कशी गेली याची माहिती घ्यायची असले तर रविंद्र कमदला पकडून चौकशी करावी अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.
या सगळ्या ड्रग्जच्या लिंकमध्ये सॅम डिसोझा, मनीष भानूशाली, किरण गोसावी, फ्लेचर पटेलपर्यंत यांचे फोटो किरीटसिंग राणांसोबत दिसतात, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतात. असे सर्व उघडपणे दिसत असताना नवाब मलिकांनी जर आरोप केला तर तो खोटा कसा म्हणायचा?, असाही सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
देशातील सर्वात मोठा ड्रग साठा मुंद्रा पोर्टवर आला आणि तो कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुंबईत छोट्या कारवाई करुन हिंदू मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. आणि सर्व लक्ष मुंद्रा पोर्टवरील ड्रग वरून मुंबईतील प्रकरणावर वळवण्याचा प्रयत्न झालेला आहे.
गौतम अदानीच्या मुंद्रा पोर्टवर पकडण्यात आलेले देशातील सर्वात मोठ्या प्रमाणातील ३००० किलो ड्रग्ज ही देशातली नव्हे तर जगातील सर्वात मोठी कारवाई आहे. पण त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यात आले. (DRI) Director of Revenue intelligence हे आयात निर्यातीच्या मालाची चौकशी करत असते, तो अर्थमंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग आहे. या DRI कडून मुंद्रा पोर्टवरील ड्रग प्रकरणाची चौकशी काढून NIA कडे वर्ग करण्यात आली. NIA हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारित काम करते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत जे गौतम अदानी हा माझा मित्र आहे असे म्हणतात. यातूनच सर्व स्पष्ट होते. गौतम अदानी यांनी केंद्र सरकार जसा अहवाल काढते तसा अहवाल काढत अफगाणिस्तान, इराणमधून येणारे कंटेनर मंद्रा पोर्टवर येणार नाहीत असे म्हणतात, ते कोण आहेत, ते फक्त पोर्टचे हँडलर आहेत. हा अधिकार सरकारच असतो, कोणा एका व्यापाऱ्याचा नाही. अदानी काय देशापेक्षा, संसदेपेक्षा मोठे आहेत का? असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.