ज्या दिवशी इथे राम नाही असे वाटेल त्या दिवशी बघू – पंकजा मुंडे
दिल्लीतील बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी आपण पक्षात नाराज नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. पण यावेळी त्यांनी काही सूचक वक्तव्य करुन आपण येत्या काळात वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहोत, असा इशाराही पक्षाला दिला आहे.
X
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचे पंकजा मुंडे यांनी मंगळवारी जाहीरपणे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पण "ज्या दिवशी इथे राम नाही असे वाटेल त्या दिवशी बघू" असा सूचक इशाराही पंकजा मुंडे यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थकांनी आपापल्या पदांचे राजीनामा दिले होते. पण पंकजा मुंडे यांनी हे सर्व राजीनामे फेटाळले आहेत. घर फुटल्याचे दु:ख काय असते ते आम्ही सहन केले आहे, त्यामुळे पुन्हा तसे व्हायला नको असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. आपली सगळ्यात मोठी ताकद ही कार्यकर्ते आहेत. माझ्या स्वार्थासाठी मी कार्यकर्त्यांचे राजीनामे घेणार नाही, असे सांगत त्यांनी सगळ्यांचे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला.
खासदार प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बीड आणि नगर जिल्ह्यांमधील मुंडे समर्थकांनी आपापल्या पदांचे राजीनामा दिले होते. यानंतर यापैकी अनेक मुंडे समर्थक पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी मुंबईत आले होते. दिल्लीतील पक्ष बैठकीनंतर पंकजा मुंडे मुंबईत आल्यानंतर त्यांनी सकाळी या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला आमदार आणि मंत्री होण्यासाठी राजकारणात आणले नव्हते तर त्यांचा उद्देश व्यापक आणि मोठा होता. आम्हा बहिणींना मंत्री होण्याची लालसा नाही. आपल्याच समाजाचे भागवत कराड मंत्री झाले तर मी नाराज का होऊ असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे.पी.नड्डा हे आपले नेते आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंकजा मुंडेंच्या दृष्टीने कौरव कोण?
"मला प्रवास खडतर दिसतो आहे, याआधीही खडतर प्रवास होता, मला संपवण्याचे प्रयत्न झाले तरी मी संपले नाही. सगळ्यांना योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल असे वाटत होते, पण कराडांना मिळाले. पण माझ्या समाजाच्या व्यक्तीवर मी नाराज का होईन. माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी माझा कधी अपमान केला नाही.
पांडवांच्या सोबत कृष्ण होता तरीही पांडवांना ५ गावं देण्यास कौरवांनी नकार दिला. पण धर्मयुद्ध टाळण्यासाठी कृष्णाने आणि पांडवांनी प्रयत्न केला. त्यामुळे धर्मयुद्ध टाळण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो"
असे सांगत पंकजा मुंडे यांनी आपण नाराज आहोत आणि योग्यवेळी निर्णय घेऊ, पण तो निर्णय घेण्याची वेळ येऊ नये असे आपल्याला वाटते, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.