सत्तेच्या हव्यासापोटी गलिच्छ राजकारण करण्यात भाजपा अव्वल :आम आदमी पार्टी
X
दिल्ली आम आदमी पार्टीने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपा केंद्रीय यंत्रणेचा गुन्हेगारी पद्धतीने वापर करत असून आम आदमी पार्टीच्या नेत्यांना अडकवू पाहत आहे, त्यांचे मनसुबे इकडे यशस्वी होणार नाहीत अशी टिका आम आदमी पार्टीचे नेते ॲड. धनराज वंजारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
आमच्या पक्षातील ४९ आमदारांवर १६९ केसेस केल्या आहेत. त्यात काही नाही, असे म्हणत न्यायालयाने त्यांना भरपूर फटकारले. आता ३५ प्रकरणे प्रलंबित आहेत आणि तीही काही दिवसांत संपतील. अशा खोट्या प्रकरणांची चौकशी करून त्यांना काय मिळते? माझ्या मते हा मानवी जीवनाचा तीन-चार हजार वर्षांचा इतिहास आहे. या तीन-चार हजार वर्षांत, कदाचित आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party ) हा संपूर्ण जगात एकमेव असा पक्ष आहे, ज्यावर सर्वाधिक प्रकरणे आहेत. स्वच्छ राजकारण करणाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना अडकवून ठेवायचे असे राजकारण भाजपा (Bharatiya Janata Party ) करते, अशी खोचक टिका ॲड धनराज वंजारी ( Dhanraj Vanjari ) यांनी केला.
भाजपा एकीकडे आमच्या पार्टीवर खोटे गुन्हे दाखल करते तर दुसरीकडे आमचे मंत्री विकत घेण्याचा प्रयत्न करते. आज दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस (bjp operation lotus ) अयशस्वी झाले आहे. सुमारे १० राज्यातील आमदार २० कोटींना विकत घेतले. दिल्लीतही ४० आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. २० कोटी कमी झाले नसते पण इथे कोणी विकले गेले नाही. भाजपा सत्तेच्या हव्यासापोटी गलिच्छ राजकारण करून सत्तेत यायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आप मुंबईचे उपाध्यक्ष संदीप कटके (Sandeep Katke ) यांनी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांच्यावर १६ केसेस केल्या होत्या. ज्यामध्ये १२ केसमध्ये निर्दोष मुक्त असून सध्या ४ प्रकरणे प्रलंबित आहेत. मनीष यांच्यावर १३ खटले होते. यापैकी १० निर्दोष सुटले तर ३ प्रलंबित आहेत. सत्येंद्र जैन यांच्यावर ४ खटले होते, त्यापैकी २ निर्दोष सुटले आणि २ प्रलंबित आहेत. दिनेश मोहनिया यांच्यावर १० खटले होते, त्यापैकी ९ मध्ये निर्दोष मुक्त झाले आणि एक प्रलंबित आहे. वंदना कुमारी यांच्यावर ६ खटले होते, सर्व निर्दोष सुटले. अखिलेश त्रिपाठी (Akhilesh Tripathi ) यांच्यावर ४ खटले होते, त्यापैकी ३ निर्दोष मुक्त झाले आणि एक प्रलंबित आहे. अशाप्रकारे, संपूर्ण ४९ आमदारांची संपूर्ण यादी आहे. कोणताही ठोस पुरावा नसतानाही गुन्हे दाखल केले जातात हे कोणतं राजकारण भाजपा करत आहे. भाजपाला आम आदमी चे काही घेणं देण नाही त्यांना फक्त सत्तेचा मलिदा खायचा आहे, असा आरोप आप मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करनेहास यांनी केला.