पुणे जिल्ह्यात भाजपची डोकेदुखी वाढणार?
X
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा पेठ आणि चिंचवडची जागा रिक्त झाली होती. त्या जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात निवडणूकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला. पण चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र या दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.
कसबा पेठ (Kasaba Peth) आणि चिंचवडसाठी (Chinchwad) पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 31 जानेवारी रोजी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 7 फेब्रुवारी उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. 8 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाणणी होणार आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवड या मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. मात्र भाजप निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र भाजपने परंपरा मोडली असल्याने प्रस्ताव आल्यास विचार करू, अशी प्रतिक्रीया नाना पटोले यांनी कसबा पेठ पोटनिवडणूकीबाबत दिली आहे.
राष्ट्रवादीने (NCP) ही निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच चिंचवड आणि कसबा पेठ या जागांवर मोठी भाऊगर्दी पहायला मिळत आहे. काँग्रेसकडून (Congress) कसबा पेठ पोटनिवडणूकीसाठी अरविंद शिंदे (Arvind Shinde), मोहन जोशी (Mohan Joshi), रोहित टिळक (Rohit Tilak), अरविंद धणगेकर (Arvind Dhangekar) यांची नावं चर्चेत आहेत. तसेच भाजपकडून शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि कुणाल टिळक (Kunal Tilak), गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या सून स्वरधा बापट, हेमंत रासने, धीरज घाटे, गणेश बीडकर यांचेही नाव चर्चेत आहेत. याबरोबरच राष्ट्रवादीकडून दीपक मानकर (deepak Mankar) आणि रुपाली पाटील ठोंबरे (Rupali patil Thombare) यांचीही नावं चर्चेत आहेत.
कसबा पेठ पाठोपाठ चिंचवड पोटनिवडणूकीसाठी लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना तिकीट देण्याचा सूर आहे. तसेच लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना तिकीट दिल्यास पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीत फायदा होईल. त्यामुळे शंकर जगताप यांना तिकीट देण्याचा सूरही भाजपमध्ये आहे.
याबरोबरच राष्ट्रवादीकडून नाना काटे, भाऊसाहेब भोईर, संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत आहेत. भाजपने पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूर या जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजपची कोंडी करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे पुणे जिल्ह्यात भाजपची डोकेदुखी वाढली आहे.