जिल्हा बँक निवडणूकीत पराभव दिसल्याने भाजपच्या दिग्गजांनी पळ काढला- एकनाथ खडसे
X
जळगाव : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० जागांसाठीही मतदान सुरू आहे. बँकेच्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित दहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यातील काही जागांमध्ये देखील शेतकरी विकास पॅनलने महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे काही ठिकाणी ही निवडणूक औपचारिकता म्हणून होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्ष रोहीणी खडसे, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याचे म्हटले होते, पण त्यांचे काही उमेदवार रिंगणात आहेत, असेही खडसे यांनी सांगितले. तसेच निवडणुकी आपला पराभव होईल या भीतीनेच भाजपच्या दिग्गजांनी पळ काढला अशी टीकाही त्यांनी केली आहे.