पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंसह ४ मराठी नेत्यांवर भाजपची मोठी जबाबदारी
X
नवी दिल्ली : भाजपनं विविध राज्यातील प्रभारी आणि सहप्रभारी पदाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. बिहार विधानसभा निवडणूकीत तावडे यांनी बिहारमध्ये पक्षाचं काम पाहिलं आहे. नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडून लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी सोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपनं बिहारकडे लक्ष दिल्याचं दिसून येतंय. तर प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जावडेकर यांचे मंत्रीपद गेल्यानंतर ते अडगळीत पडले होते. परंतु आता पुन्हा त्यांच्यावर पक्षानं नवी जबाबदारी दिली आहे.
राहुल गांधी केरळमधूनच खासदार आहेत. काँग्रेस आणि डावे पक्षांचा पगडा असलेल्या केरळचे आव्हान जावडेकरांच्या खांद्यावर आले आहे. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांना राजस्थानचे सहप्रभारी करण्यात आले आहे. तर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मध्य प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणावर कोणती जबाबदारी?
विनोद तावडेः बिहार, प्रभारी
प्रकाश जावडेकरः केरळ, प्रभारी
विजय रहाटकरः राजस्थान, सहप्रभारी.
पंकजा मुंडेः मध्य प्रदेश, सहप्रभारी