Bilkis Bano case : हाच का महिलांचा सन्मान, शरद पवार यांचा मोदींना सवाल
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण करताना महिलांचा सन्मान केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर गुजरात सरकारने घेतलेल्या निर्णयावरून शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे.
X
देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान व्हायला हवा, असं मत व्यक्त केले. मात्र त्यानंतर काही वेळातच गुजरात सरकारने बिल्कीस बानोवर बलात्कार केलेल्या 11 आरोपींची मुक्तता केली. त्यावरून शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे.
शरद पवार दिल्लीत बोलत असताना म्हणाले की, संपुर्ण देशाने 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण ऐकलं. त्यामध्ये ते महिलांविषयी चांगलं बोलले. महिलांच्या सन्मानाविषयी बोलले. मात्र एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलत असताना दोनच दिवसांनी गुजरात सरकारने एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून दिलं. बिल्कीस बानोवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सर्वांना माहिती आहे, असं म्हणत शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.
बिल्कीस बानो प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. मात्र गुजरात सरकारने चांगली माणसं म्हणत त्यांना सोडून दिलं, हा महिलांचा सन्मान आहे का? असा सवाल शरद पवार यांनी केला.
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी महिलांविषयी देशाला जी दिशा दिली. तो रस्ता हाच आहे का? असा सवाल करत यातून नेमका काय संदेश देणार आहात? असंही शरद पवार यांनी विचारले.
गुजरात सरकारने जे काम केले आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या काम करण्याच्या पध्दतीमुळे अल्पसंख्यांक समाजाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत, असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केले.