भाजपच्या शिंदे गटावर गुळण्या, शिवसेनेची टीका
राज्यात नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सरू होता. त्याच वेळी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजकीय भुकंप घडवला. त्यावरून भाजप नेत्याने केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत शिवसेनेने टीका केली आहे.
X
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाने स्वपक्षाविरोधात बंड केल्याने सत्तानाट्य रंगले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मात्र त्याच वेळी बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत राजकीय भुकंप घडवून आणला. त्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून राज्यातही बिहारची पुनरावृत्ती होणार असल्याचा इशारा भाजपला दिला आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, बिहारमधील भाजप वगळता इतर सदस्यांनी ईडी वैगेरेच्या फासाला न जुमानता बिहारी अस्मितेसाठी लढू पण शरण जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर नितीश कुमार यांनी उंटाच्या पाठीवर काडी ठेवली असं मत सामनातून व्यक्त केलं. त्यामुळे बिहारमध्ये घडणाऱ्या राजकीय क्रांतीचे पडसाद देशभर उमटतात असं म्हणत सामनातून भाजपला इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातले शिवसेना आङाडीचे सरकार पाडले या आनंदात खुशीची गाजरं खात असताना बिहारमध्ये भाजपविरोधात बंडाची ठिणगी पडली. शेजारी पश्चिम बंगाल आहे. महाराष्ट्रातही अशांत टापू आहे, याचा संदर्भ देत बिहारची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होण्याची शक्यता सामनातून व्यक्त केली आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणूकांचे गणित डोळ्यासमोर ठेऊनच नितीश कुमार यांनी हे धाडसी पाऊल उचलले असल्याचे स्वागत देशातील समस्त विरोधी पक्षांनी करायला हवे. त्याबरोबरच ईडीचा धाक दाखवून कपट कारस्थानाने महाराष्ट्राचे सरकार पाडले. पण बिहारात नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेपासून दूर फेकले, हे सत्य आहे. त्यामुळे 2024 साली पुन्हा आम्ही आणि आम्हीच पुन्हा येणार हा भाजपचा अहंकार आहे. 2024 साली देशात फक्त भाजपच येणार अशी वल्गना जे पी नड्डा करत असताना तिकडे भाजप बिहार गमवत होता, अशी टीका सामनातून केली आहे.
जयप्रकाश नारायण यांच्या क्रांतीच्या आंदोलनातून नितीश कुमार पुढे आले आहेत. त्या आंदोलनात लालूही होते. पण नितीश आणि लालूंमध्ये सतत संघर्ष राहीला. तो संघर्ष आता तरी थांबवायला हवा, असं मत अग्रलेखात व्यक्त केले आहे.
मात्र या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, सध्या लालू यादव यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांचे फिरणे बोलणे क्षीण झाले आहे. तर त्यांची ही दशा भाजपने केली. मात्र त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी मोठे आव्हान उभे केले. परंतू दहा बारा जागांवर गडबड करून भाजपने बाजी मारल्याचा आरोप शिवसेनेने केला.
त्यानंतरही तेजस्वी यादव यांनी मैदान सोडले नाही. त्यांनी आता नितीश कुमार यांच्यासोबत सरकार बनवलं आहे. तसंच ही आघाडी 2024 मध्येही भक्कम राहिली तर लोकशाहीचे निकाल बदलू शकतात, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
महाराष्ट्रात मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्यांच्यावर आणि जे पी नड्डा यांच्यावर निशाणा साधताना शिवसेनेने म्हटले आहे की, मी पुन्हा येईन घोषणेप्रमाणेच आम्ही येऊ, फक्त आम्हीच घोषणा आहे. ते मतपेटीच्या माध्यमातून येऊ शकतात. पण या घोषणा देणारे लोकशाही मानतात का? असा थेट सवाल भाजपला केला आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार आम्ही हिंदूत्व आणि स्वाभिमानासाठी बाहेर पडलो असल्याचे म्हणतात. मात्र बिहारचे भाजप नेते सुशील मोदी यांनी शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी शिवसेना आम्हीच फोडली असल्याचे वक्तव्य करून शिंदे गटाचा दावा खोडून काढला. त्यामुळे शिंदे गटाचे वस्रहरण झाले आहे. एवढंच नाही तर भाजपने शिंदे गट जे सांगतोय त्यावर गुळण्या टाकण्याचा प्रकार केला असल्याची टीका यावेळी सामनातून करण्यात आली.
पुढे असंही म्हटलं आहे की, नितीश कुमार यांनी सध्या एक वावटळ निर्माण केली आहे. या वावटळीला ईडी-सीबीआयसुध्दा रोखू शकली नाही. तेजस्वी यादव हे तर बेधडक आहेतच. सत्तेचा अमरपट्टा कोणीही बाधून येत नाही. सिंहासनावरून कधीतरी उतरावेच लागते. अहंकाराच्या भींती जनताच तोडते. बिहारमध्ये त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उध्वस्त होतील, असा आशावाद शिवसेनेने व्यक्त केला आहे.
नितीश कुमार यांनी एक पाऊल टाकले आहे. त्याचे अनेक पाऊलं पडो. राजकारणात कुणीच कायमचा संपत नसतो. पण याला संपवू त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे, असा थेट इशाराच भाजपला दिला आहे.