Bihar Politics : फ्लोर टेस्टपूर्वी RJD नेते सुनील सिंह यांच्या घरावर CBI चा छापा
नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत तेजस्वी यादव यांच्या पाठींब्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठा भुकंप झाला. मात्र त्यापाठोपाठ RJD नेते सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे.
X
नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. त्यानंतर आज बिहारमध्ये बहुमतचाचणी पार पडणार आहे. तर विधानसभाध्यक्ष विजय सिन्हा यांच्यावरील अविश्वास ठरावावरही आज मतदान होणार आहे. त्यापुर्वीच RJD नेते सुनील सिंह यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
RJD नेते सुनील सिंह यांच्या घरावर छापा टाकण्यामागे 2004 ते 2009 दरम्यान लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीच्या बदल्यात जमीन देण्यास सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी थेट पैसे घेण्याऐवजी नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीर काम करण्याची जबाबदारी लालू प्रसाद यादव यांचे पीए भोला यादव यांच्यावर देण्यात आल्याचे म्हटले आहे. तर सीबीआयने मारलेल्या छाप्याचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचे सांगण्यात आले आहे.
यासाठी सीबीआयने सुनील सिंह सहकारी संस्थेशी संबंधीत आहेत. तसेच ते RJD चे खजिनदारदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर छापेमारी करण्यात आल्याची चर्चा आहे. तर सीबीआयने पटणा शहरातील शास्रीनगर भागातील घरावर छापेमारी केली आहे.
बहुमत चाचणीचं काय आहे गणित?
नितीश कुमार यांच्या सरकारची आज फ्लोअर टेस्ट पार पडणार आहे. त्यासाठी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्याकडे 164 आमदार आहेत. तर बहुमतासाठी 122 आमदारांची आवश्यकता आहे.