बिहारमध्ये पुन्हा 'लालटेन' राज
महाराष्ट्राच्या राजकीय नाट्याच्या (Maharashtra Political Crisis) अंकाचा शेवट होण्यापुर्वीच बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे अखेर नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
X
महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींपाठोपाठ बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपला धक्का देत बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठा भुकंप झाला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांचा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलासोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर 24 तासांतच नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
भाजप-जदयूचं सरकार कोसळल्यानंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना पाठींबा जाहीर केला. त्यामुळे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नव्या सरकारमध्ये नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासंदर्भातील माहिती राष्ट्रीय जनता दलाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून दिली आहे.
माननीय मुख्यमंत्री जी और उपमुख्यमंत्री जी का कल अपराहन 2 बजे राजभवन में शपथ ग्रहण समारोह होगा।
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) August 9, 2022
2013 मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर गुजरात दंगलीवरून टीकास्र सोडत नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले होते. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत नितीश कुमार यांचा पराभव झाला. त्यातच बिहारमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणूकीत अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
2015 मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूका नितीश कार यांनी काँग्रेस, राजदसह घटकपक्षांसह महाआघाडी करत लढवल्या. मात्र पुन्हा एकदा 2017 मध्ये नितीश कुमार यांनी थेट महागठबंधनातून बाहेर पडून भाजपसोबत संसार थाटला. यावेळी त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
त्यानंतर 2019 मध्ये भाजपसोबत लोकसभा निवडणूका लढवल्या. त्यामध्ये नितीश कुमार यांच्या खासदारांची संख्या 16 वर पोहचली. तसेच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाला अवघ्या 43 जागांवर समाधान मानावं लागलं. तर भाजपने जदयूच्या दुपटीपेक्षा अधिक जागा जिंकल्या. मात्र यावेळी भाजपने राजकीय डाव टाकत नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदी बसवले.
या काळात बिहारच्या मुख्यमंत्री पदी काम करत असताना भाजप आणि जदयू मधील धुसफुस वाढत गेल्याने अखेर नितीश कुमार यांनी भाजपसोबत काडीमोड घेत राजद सोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी दुपारी 2 वाजता नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
नितीश कुमार यांनी का घेतला काडीमोड?
भाजपने जदयूला संपवण्याचा कट रचला असा आरोप करत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, जनता दल युनायटेडच्या आमदार आणि खासदारांशी चर्चा करूनच मी हा निर्णय घेतला आहे. तसंच जोपर्यंत एकत्र राहिलो तोपर्यंत आम्ही युतीचा धर्म पाळल्याचे मतही नितीश कुमार यांनी व्यक्त केले.
याबरोबरच जे. पी. नड्डा यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतांना देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील आणि भाजपच उरेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नितीश कुमार यांच्या मनातील अस्वस्थता वाढत गेल्यानेच त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असल्याचे राजकीय विश्लेषकांचं मत आहे.