UP ELECTION : गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांना आव्हान, चंद्रशेखर आझाद मैदानात
X
उ.प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, कारण केंद्रातील सत्तेचा मार्ग उ. प्रदेशातून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे उ. प्रदेशातील निकालांमुले हवा कोणत्या दिशेला वाहते आहे, याचा अंदाज येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्व पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येमधून लढणार अशी चर्चा होती. पण पक्षाने त्यांची उमेदवारी गोरखमधून जाहीर केली. यानंतर योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सपा, काँग्रेसतर्फे कोण लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान समाजवादी पार्टी आणि भीम आर्मी पार्टीमध्ये युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. पण ही चर्चा फिस्कटल्यानंतर आता भीमा आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आपण गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावर चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करत पक्षाचे आभार मानले आहेत तसेच, " बहुत - बहुत आभार साधुवाद। पिछले 5 साल भी लड़ा हूँ। अब भी लड़ूंगा। जय भीम,जय मण्डल। बहुजन हिताय, बहुजन सुखाय।" असे म्हटले आहे. उ.प्रदेशात आता भीम आर्मी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे.
उ.प्रदेशातील सहारनपूर भागात भीम आर्मीचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या भागातील जागांवर भीम आर्मी कसा प्रभाव पाडते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत युतीबाबत चर्चा झाली होती, पण त्यांना दलित मतांची गरज नाही, असे दिसते आहे, त्यामुळे स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे.