दावोस येथे ग्रीनको कंपनीचा राज्य सरकारसोबत करार...
X
नव्या वर्षाच्या सुरवातीलाच औरंगाबादतील ऑरिक सिटीमध्ये मोठे उद्योग येण्यास सुरवात झाली आहे. याचे संपूर्ण श्रेय हे शिंदे-फडणवीस सरकारचे असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दावोस येथे सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील ऑरिक सिटीमध्ये नविन वर्षाच्या सुरवातीला जगभरातील मोठ-मोठे उद्योग येण्यास सुरवात झाली आहे. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी ऑरिकमध्ये वर्षभरात जवळपास सुमारे १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीमुळे थेट औरंगाबाद जिल्ह्यातील साडेसहा हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत कंपनीसोबत या गुंतवणुकीविषयी सामंजस्य करार झाल्याची घोषणा महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दावोस येथे सांगितले आहे.
औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या औरंगाबादजवळील शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीमध्ये मोठे उद्योग यावेत, यासाठी स्थआनिक उद्योजकांच्या सीएमआयए आणि मसिआ या संघटना सतत शासनाकडे पाठपुरावा करत होत्या. एवढेच नव्हे तर सीएमआयएचे पदाधिकारी केंद्र आणि राज्य सरकारसोबतच विविध उद्योगांच्या प्रमुखांना भेटून औरंगाबादमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असल्याचे पटवून देत होते. या प्रयत्नांना आता यश आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑरिक सिटीअंतर्गत असलेल्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात जागतिक दर्जाचे औद्योगिक इन्फ्रास्ट्रक्चर असलेली १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. यासोबतच समृद्धी महामार्गाला ऑरिकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. इतकेच नाही तर चिकलठाणा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, विजेवर चालणारी रेल्वे असल्याने दळणवळणाची उत्तम सुविधा येथे आहे. पंचतारांकित हॉटेल्स, नॅशनल लॉ स्कूल, नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्था येथे आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात पाच औद्योगिक वसाहती असून, सुमारे साडेचार ते पाच हजार लहान-मोठे उद्योग येथे कार्यरत आहेत. याचा विचार करता ऑरिकमध्ये ग्रीनको ही अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील नामांकित कंपनी १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घोषित केले आहे. उद्योग मंत्र्यांच्या या घोषणेमुळे औरंगाबाद उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रीनको कंपनीकडून थेट साडेसहा हजार जणांना रोजगार मिळणार आहे. ऑरिकमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात गुंतवणूक होणार असल्याची बातमी कळताच औरंगाबादच्या औद्योगिक विश्वासाठी हा सोन्याचा दिवस असल्याचे उद्योजकांनी सांगितले आहे.