अतुल लोंढे यांनी मोजली नितेश राणे यांची ऊंची
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यामुळे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नितेश राणे यांची ऊंची मोजली. नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन आणि कुख्यात अंडरवर्ल्ड दाऊदशी केली होती. त्यापार्श्वभुमीवर अतुल लोंढे यांनी नितेश राणे यांच्या ऊंचीवर भाष्य केले आहे.
X
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी करुन नितेश राणे (Nitesh Rane comment on Rahul Gandhi) यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देतांना राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याइतकी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही. त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी, अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा थेट इशारा अतुल लोंढे (Atul lodhe) यांनी दिला.
पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वाह्यात बडबड केली. त्यावरूनच त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. दररोज कोणाला तरी अर्वाच्च शिव्या देण्यापलिकडे राणेंना काही येत नाही. राहुल गांधी पाकिस्तानची (Pakistan) भाषा बोलतात. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मुक्ताफळे नितेश राणे यांनी उधळली आहेत. राहुल गांधी हे सरकारी घरातच राहून देशाविरोधात बोलतात, असेही नितेश राणे म्हणाले. राहुल गांधी हे दिल्लीत सरकारी घरातच राहतात. अंधेरीतील (andheri, Juhu) राणेंच्या राजमहालासारख्या अवैध बांधकाम केलेल्या घरात ते रहात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण ते गांधी आहेत राणे नाहीत. नेहरु-गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग व बलिदान राणेसारख्या सुमार बुद्धीच्या लोकांना या जन्मीतरी समजणे शक्य नाही, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली.
नितेश राणेंनी राहुल गांधी (Gandhi Neharu Family) यांची तुलना दहशतवादी लादेन, माफिया दाऊदशी केली. त्याच राहुल गांधी यांच्या हाताखाली नितेश यांचे पिताजी नारायण राणे (Narayan Rane) यांनी दहा-बारा वर्षे काम केले आहे. याची त्यांना माहिती नाही का? नसेल तर नितेश यांनी वडिलांना विचारुन घ्यावे. नितेश राणे यांच्या बोलण्याला महत्व देण्याची फारशी गरज नाही. पण त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे, अन्यथा आम्हालाही तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. तेव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असेही अतुल लोंढे यांनी ठणकावून सांगितले.