तिरंग्यातून हिरवा रंग हटवणार का? असदुद्दीन ओवैसी यांचा संतप्त सवाल
देशात धार्मिक वातावरण गढूळ होत असतानाच AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला तिखट सवाल उपस्थित केले.
X
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला तिखट सवाल केले. यावेळी बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, कर्नाटकमधील गुलबर्गा येथील रेल्वे स्टेशनला हिरवा रंग दिला होता. मात्र त्याठिकाणी असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी तो मुस्लिमांचा रंग आहे, असं म्हणत रंग हटवायला लावला. जर रेल्वे स्थानकावरचा हिरवा रंग हटवायला लावला असेल तर उद्या मोदी सरकार तिरंग्यावरचा हिरवा रंग हटवणार का? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला.
पुढे बोलताना ओवैसी म्हणाले, मोदी सरकार कलिंगडावर बंदी घालणार का? आणि देशातील नागरिकांना नागपूरच्या संघ मुख्यालयात उगवलेला संत्रा खायला लावणार का? असे अनेक प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.
मुस्लिमांच्या शैक्षणिक स्थितीवर केले भाष्य 25 टक्के मुस्लिम विद्यार्थी पैशाविना शिक्षण सोडून देतात, असं NSSO च्या डेटामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा विचार केला तर सगळ्यात जास्त सरासरी अनुपस्थिती मुस्लिम विद्यार्थ्यांची नाही का? सगळ्यात कमी शाळेत नोंदणी मुस्लिम विद्यार्थ्यांची होत नाही का? AISS च्या रिपोर्टनुसार मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रमाण 5 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आले आहे. हे खरं नाही का? पण एवढं सगळं असूनही अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकाविषयी कोणत्याही तरतूदी नसल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. तसेच भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 19 टक्के भाग असलेल्या मुस्लिमांविषयी कोणत्याही तरतूदी न करणे, हे यांचे प्रेम असल्याचा खोचक टोला ओवैसी यांनी लगावला.
अल्पसंख्यांकाच्या बजेटला कात्री लावून 40 टक्के कमी केल्याचं सत्य नाही का? शिष्यवृत्तीच्या पैशांमधून 560 रुपये कमी करण्यात आले. हे तुमचं प्रेम आहे जे द्वेषाची निशाणी बनत असल्याचे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
भाजप खासदाराने केली हिंसेची भाषा भाजपच्या एका खासदाराने चाकूचा वापर मुस्लिमांविरोधात करा, असं स्पष्टपणे म्हटलं. दिल्लीतही भाजप खासदाराने अशाच प्रकारे गरळ ओकल्याचे ओवैसींनी म्हटले.
बिल्कीस बानो प्रकरणावरही भाष्य पंतप्रधान नारी शक्तीविषयी बोलतात. पण बिल्कीस बानो जर मुस्लिम नसती तर तिला न्याय मिळाला असता, असं मत व्यक्त करतानाच बिल्कीस बानो 20 वर्षापासून लढत आहे. मात्र तिचे नाव बिल्कीस बानो आहे. त्यामुळे तुम्ही तिच्यासोबत न्याय करत नसल्याचे ओवैसी म्हणाले.
अखेर ओवैसी यांनी मुस्लिमांचे सामाजिक स्टेटस वाढवण्यासाठीची आणि बिल्कीस बानोला न्याय देण्याची मागणी ओवैसी यांनी केली.