तुमची पोरं अमेरिकेत आणि आमची पोरं अमरावती बंद करायला...
X
दंगलीचा आरोप असणारे भाजप नेते अनिल बोंडे यांचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्वीटवरुन आनंद शितोळे यांनी बोंडे यांना तुमचा मुलगा अमेरिकेत आणि आमची पोरं राजकमल चौकात कशाला बोलवता? असा सवाल उपस्थित केला आहे...
दंगलीत नेमकी कुणाची डोकी फुटतात, कुणाच्या अंगावर खटले पडतात, कोण कोर्टाच्या खेट्या मारत आणि चिथावणीखोर नेत्यांची लेकरं बाळ सुशेगात परदेशात शिकून स्थायिक होऊन पैसे कमवतात याचं प्रत्यक्ष उदाहरण आणि पुरावा. फडणवीस सरकारमध्ये कधीकाळी मंत्री असलेले हे डॉक्टर अनिल बोंडे. यांचं पहिलं ट्वीट आहे २२ एप्रिल २०२१.
अनिल बोंडे यांचा डॉक्टर मुलगा कुणाल यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी शेअर केलेले आहेत. लग्न रामनवमीच्या मुहूर्तावर लागलं. कुठे? तर अमेरिकेत मिनिसोटा मधल्या हिंदू मंदिरात. डॉक्टर अनिल बोंडे यांचा मुलगाही डॉक्टर आहे आणि लग्न अमेरिकेत करतोय म्हणजे अमेरिकेत शिकून स्थायिक झालेला असेल.
यांचं दुसर ट्वीट आहे १२ नोव्हेबर २०२१. उद्या अमरावती बंद झालंचं पाहिजे, मी उद्या सकाळी ९.३० वाजता राजकमल चौकात येतोय तुम्हीही या. असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. तुमची लेकर अमेरिकेत शिकून डॉक्टर होऊन तिकडं लग्न वगैरे करणार आणि तुम्ही इथल्या स्थानिक तरुणांना अमरावती बंद करायला भडकवणार.
हे सगळे उद्योग पोलिसांनी बंद केलेले आहेत, मनाई आहे तरीही तुम्हाला गर्दी जमवायची आहे. आणि लोकांवर खटले दाखल करायचे आहेत का? बरं तुमच्यावर खटले दाखल झाले तरीही आमदार म्हणून तुम्ही त्यातून बाहेर पडणार, उद्या सरकार आल की तुमच्यावर असणारे खटले राजकीय म्हणून काढून टाकणार आणि गरिबांची पोर?
त्यांनी कोर्टात चकरा मारायच्या आणि झिजून मरायचं? खाजगी नोकरीत सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन लागतं, तिथे पोलिसांनी दंगलीचा गुन्हा नावावर आहे म्हणून लिहून दिलं की पोरांनी काय करायचं? चहाची टपरी, वडापाव गाडी की तुमच्या मोर्चात रोजाने झेंडे फडकवत फिरायचं?
सामान्य मुलांनी शिकूच नये का? चांगल्या नोकऱ्या करूच नयेत का? तुम्हाला हे असले बंद करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात वाचनालय, अभ्यासिका, नोकरी मार्गदर्शन केंद्र, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरु करावसं वाटत नाही?
इंग्रजी बोलण्याच्या कार्यशाळा घेऊ वाटत नाहीत? मग पोर शिकली आणि रांगेला लागली तर ही डोके फोडायची दंगल करायला सैन्य कुठून येणार ना? हिंदू मुस्लीम असोत की अन्य कुठलेही धर्मीय असोत. लोकहो, आपल्याला भडकवून आपलीच डोकी फोडणारी ही नीच लोक ओळखून यांच्यापासून चार कोस लांब राहण्यात आपलं हित आहे. आपण नीट शिकलो, नीट कामधंदा केला आणि आईबापाला नीट सांभाळून घर चार पावलं पुढ नेलं की तोच खरा धर्म सांभाळून वाढवला, बाकी सगळ झूट.