बेकायदेशीर कब्जाच्या जमिनीवर अवैध उत्खनन आणि मुरुमाची चोरी..
X
लोकप्रतिनिधींचे काम कायदे करण्याचे असते परंतू बुलडाणा जिल्ह्यात कायदा मोडणारे लोकप्रतिनिधी असल्याचे आरोप होत आहेत... महीलेच्या जमीनीवर कब्जा करुन अवैध उत्खनन आणि मुरुमाच्या चोरीचा आरोप शिवसेना आ. संजय गायकवाड यांच्यावर झाला असून त्यांनी या आरोपाचा इन्कार केला असला तरी प्रशासन व्यवस्था काय निर्णय घेणार ? असाही प्रश्न उपस्थित राहत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये असलेल्या शेतीवर बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बेकायदेशीरपणे कब्जा करून, ही जमीन जबरदस्ती नावावर करून देण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार नागपूर येथील रिता उपाध्याय या महिलेने अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे, ज्यामध्ये आमदार गायकवाड यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली, तर दुसरीकडे महिलेने केलेले सर्व आरोप हे तथ्यहीन असून तो त्यांचा घरगुती वाद असल्याचे सांगत सर्व आरोप आमदार गायकवाड यांनी धुडकावून लावले आहेत...
मोताळा तालुक्यामध्ये येणाऱ्या राजूर गावाजवळ रिता उपाध्याय-म्हैसकर या नागपूर येथील महिलेची दीड एकर शेती असून सदर शेती ही बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या शेतीला लागून आहे, आपण बाहेरगावी राहत असल्याने आमदार संजय यांनी राजूर येथील माझे नातेवाईक सोमनाथ चौबे, दीपा चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्याशी संगनमत करून खोटे दस्तऐवज तयार करून माझ्या नावावर असलेल्या शेतीवर कब्जा केल्याची तक्रारी महसूल विभागासह पोलीस प्रशासनाकडे केलेली आहे...
दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यान आमदार गायकवाड यांनी माझ्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा करून अवैध उत्खनन करत, लाखो रुपयांच्या मुरमांची चोरी केली व बेकायदेशीर बांधकाम केले आहे, असा आरोप रिता उपाध्याय यांनी केले असून माझ्या शेतात जाण्यासाठी मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, जमिनीचा रस्ता देखील आमदार गायकवाड यांनी तार कुंपण करून बंद केलेला आहे, त्याचबरोबर ही जमीन हडपण्यासाठी पेरेपत्रकावर दीपाली चौबे यांच्या नावाची नोंद करण्यासाठी तहसील विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप रिता उपाध्याय यांनी केला आहे, मी ही जमीन विक्री करण्यासाठी कुठलाही व्यवहार केलेला नाही, मात्र आमदार गायकवाड हे पाच लाख रुपये व्यवहार झाल्याचे निराधार वक्तव्य करत आहेत, ते पदाचा आणि सत्तेचा दुरुपयोग करून अबला नारी वर अत्याचार करत असल्याचा गंभीर आरोप देखील उपाध्याय यांनी करत, इतर दोन व्यक्तींची उदाहरणे देऊन आमदाराने त्यांची जमीन हडप केल्याचा आरोप ही महिला करत आहे...
तर या संपूर्ण आरोपाचे आमदार संजय गायकवाड यांनी खंडन केले असून, कुठलीही जमीन बळकावण्याचा किंवा अवैध उत्खननाचा विषय अजिबात नाही, जमीन विकत घेण्यासंदर्भात आमचा पाच लाख रुपयांचा तोंडी व्यवहार झालेला आहे, परंतु या जमिनीवर दिपाली चौबे या महिलेचा ताबा असल्याचे सांगत दीपाली चौबे ही रिता उपाध्याय यांची नात्याने मामी आहे, त्यामुळे हा त्यांचा घरगुती वाद असून त्यांनी तो वाद आपसात मिटवावा, मी जमिनीचा व्यवहार करायला तयार आहे, किंवा ते व्यवहार करायला तयार नसतील तर मला त्या जमिनीशी काही घेणे देणे नाही, रेडीरेकनरच्या 23 लाख रुपये भावाने आमचा सौदा झाला होता, आणि रिता उपाध्याय यांना आम्ही पाच लाख रुपये दिले होते, मात्र लॉकडाऊन मुळे ते खरेदीसाठी इकडे येऊ शकले नाही, आणि आता रिता उपाध्याय ह्या खरेदीसाठी आल्या असता दिपाली चोबे ह्या खरेदीसाठी आड आल्या असून ही जमीन माझ्या ताब्यात असल्याचे सांगत आहे, आणि या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही असे सांगितल्याने त्यांनी आपला वाद आपसात मिटवावा अन्यथा मला त्या जमिनीची काही गरज नाही, असे आमदार गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळत सांगितले आहे...
गट क्रमांक 62 मधील जमीन गेल्या वीस वर्षापासून माझ्या ताब्यात होती आणि आजही माझ्याच ताब्यात आहे, त्यापैकी माझ्या नावावरील साडेचार एकर जमीन मी आमदार गायकवाड यांना विकली, मात्र रिता उपाध्याय यांच्या नावावरील दीड एकर जमीन आजही तिथेच आहे, परंतु या जमिनीचे पेरेपत्रक माझ्या नावावर असून वीस वर्षापासून मीच ति जमीन पेरत आहे,
ही जमीन उपाध्याय च्या नावावर आहे हे आम्हाला आज पर्यंत माहित नव्हते , मात्र तिच्यावर कोणत्याही प्रकारचा जमीन विकणे संदर्भात दबाव आणण्याचा काहीही प्रकार नाही, तिची जमीन असेल तर तिला द्यायला ही आमची हरकत नाही, मात्र आमचा वीस वर्षापासून या जमिनीवर ताबा असल्याने आम्ही सहजासहजी ही जमीन सोडणार नाही, असेही यावेळी दिपाली चौबे यांनी सांगितले आहे, त्याचबरोबर ही जमीन विक्री संदर्भात आमदाराचे निकटवर्तीय ज्ञानेश्वर वाघ यांनी रिता उपाध्याय यांच्यासोबत व्यवहार केले होते, मात्र त्यांना किती रुपये दिले याची कल्पना नाही, असेही यावेळी दिपाली चौबे यांना सांगितले आहे...
रिता उपाध्याय यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी जमिनीच्या संदर्भात बोराखेडी पोलिस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयात देखील तक्रार केली होती, दरम्यानच्या काळामध्ये संबंधित महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट दस्तावेज तयार करून पेरेपत्रकावर दीपाली चौबे या महिलेची नोंद करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने हा संपूर्ण प्रकार रिता उपाध्याय यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कळविले होते, मात्र त्यांच्या या तक्रारीवर प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नसून, काहीच दखल घेतली जात नसल्याने रिता उपाध्याय यांनी पुन्हा 24 ऑक्टोबर रोजी पोलीस महानिरीक्षक यांच्यासह पोलीस विभागाच्या अधिकृत साइटवर ऑनलाइन तक्रार नोंदवली होती, आणि त्यानंतर प्रशासनाने दखल घेत पोलीस महानिरीक्षक कार्यालयांमधून बोराखेडी पोलिस स्टेशनला यासंदर्भात तपास करण्यासाठी सूचना करण्यात आल्या.
आणि बोराखेडी पोलिस स्टेशन कडून रिता उपाध्याय यांना आपले लेखी बयान देण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आले, मात्र वकिलांच्या सल्ल्यानुसार उपाध्याय यांच्या जिवाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होईल असा संशय आल्याने उपाध्याय यांनी बोराखेडी पोलिस स्टेशनला आपले लेखी बयान नागपूरवरून पाठवून दिले, सोबतच लेखी बयाना ची प्रत ही देखील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्याचे रिता उपाध्याय यांनी सांगितले आहे...
आज रोजी ही जमीन माझ्याच नावावर असून या जमीनीमध्ये जाण्यासाठी मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, आणि आमदाराने त्यांच्या जमिनी सोबत माझी जमीन देखील तारेचे कुंपण करून हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यासह इतर व्यक्तींवर देखील गुन्हे दाखल करण्यात यावे, आमदाराचे निलंबित करावे, अशी मागणी रिता उपाध्याय यांनी केली आहे... मात्र या संपूर्ण प्रकरणी आता शासन-प्रशासन काय निर्णय घेते आणि काय आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...